पुणे जिल्हा: सत्काराच्या खर्चाला फाटा देत माणुसकीची भिंत

मुलीला मदत व गरजू महिलांना साड्या वाटप
शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरुर) येथील उद्योजक संजय नरके हे सामाजिक कार्यात पुढाकार घेतात. त्यांच्या मुलीचा नुकताच विवाह झाला. त्यांनी सत्काराच्या खर्चाला फाटा देत वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलीला शालेय मदत, गरजू महिलांना साड्या देत सामाजिक बांधिलकी जपली.
शिक्रापूर येथील चैताली उद्योग समूहाचे संचालक संजय नरके यांनी यापूर्वी अनेक गरजू शालेय मुलांना मदतीचा हात पुढे केला आहे, त्यांची मुलगी श्रद्धा नरके हिचा विवाह तळेगावचे श्रीनाथ शिनलकर यांच्याशी झाला. यावेळी नरके परिवाराने विवाहप्रसंगी होणाऱ्या सत्काराच्या खर्चाला फाटा दिला.
या रकमेतून त्यांनी विद्याधाम प्रशाला शाळेतील अपघाती निधन झालेले शिपाई योगेश गायकवाड यांच्या मुलीच्या शिक्षणाच्या खर्चासाठी पंधरा हजारांचा धनादेश, गरजू महिलांसाठी साड्या सामाजिक कार्यकर्ते शेरखान शेख यांच्याकडे सुपूर्त केल्या. यावेळी शिरुर बाजार समितीचे माजी उपसभापती अरविंद ढमढेरे, विश्वास ढमढेरे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, मनसेचे कैलास नरके, शरद नरके, उद्योजक रवींद्र भुजबळ उपस्थित होते,





