पुणे जिल्हा : केमिकल टाकणाऱ्या समाजकंटकाचा कसून तपास

गणेगाव खालसात कामिनी ओढ्यातील दूषित प्रकरण
रांजणगाव गणपती – गणेगाव येथील ओढ्यातील पाण्यामध्ये केमीकल सोडणा-या आरोपीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गुन्ह्यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली. याबाबत गणेगाव खालसाचे ग्रामसेवक श्रीकांत वाव्हळ यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती.
(दि. ११) जुलै रोजी रात्रीच्या सुमारास गणेगाव खालसा गावचे हद्दीतील कामीनी ओढ्यामध्ये कोणीतरी समाजकंटकाने विषारी केमीकल सोडल्याने ओढ्यातील पाणी दूषित झाले होते. त्या केमीकलमुळे पाण्याचा रंगा लालसर होऊन पाण्यामुळे मानवी व प्राण्यास धोका निर्माण झालेला होता. कारण हे केमीकल युक्त पाणी कामीनी ओढ्यातून पुढे कोंढापुरी येथील तळ्याला मिळत असल्याने व कोंढापुरी तलावातील पाणी आजुबाजुच्या रांजणगाव गणपती, शिक्रापूर, खंडाळे, गणेगाव खालसा आदी गावांना पिण्यासाठी व वापरासाठी पुरवठा होत असल्याने या प्रकरणांची पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने गंभीर दखल घेतली होती.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी भेट देऊन पाहणी करून पाणी कोंढापुरी तलावामध्ये जाऊ नये, यासाठीच्या उपाययोजना केल्या होत्या. गणेगाव खालसा गावचे ग्रामसेवक श्रीकांत सुखदेव वाव्हळ यांच्या फिर्यादीवरून दि. 13 जुलै रोजी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दूषित पाण्यामुळे ओढ्यातील वनस्पती करपून, मासे मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपी शोधून काढला. किशोर दशरथ मोरे (रा. बेकराईनगर, हडपसर, ता. हवेली) हा पुणे रेल्वे स्टेशन येथून परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास तपास पथकाने ताब्यात घेतले. शिरुर येथील न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुजरातमधील कंपनीला बनावट पावती दिली
आरोपीने त्याच्याकडील टँकरमध्ये रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील नामांकित कंपनीमधून (दि.९) जुलै रोजी ३५ टन हायड्रोक्लोरीक अॅसिड भरुन ते सुखा केमीकल कंपनी, बडोदरा, गुजरात येथे खाली करण्यासाठी भरले होते. परंतु आरोपी याने हे केमीकल संबंधित कंपनीमध्ये खाली न करता गणेगाव हद्दीतील कामिनी ओढ्यातील पाण्यामध्ये सोडून दिले आहे. हे ॲसिड सुखा केमीकल कंपनीमध्ये जमा केल्याची बनावट पावती तयार करुन संबधित कंपनीस पाठविली होती. त्यानुसार दाखल गुन्हयात इतर कोणाचा सहभाग आहे काय, यापूर्वी असा प्रकार कोठे केला आहे काय याबाबत पोलीस कसून तपास करीत आहेत.





