Pune District : धुमाकूळ घालणारा बिबट्या चास येथे जेरबंद

रांजणी – चास (ता.आंबेगाव) येथे गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणारी बिबट मादी पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यास वनविभागाला बुधवार, दि.२५ रोजी पहाटे यश आले आहे. ही बिबट मादी जेरबंद झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
चास येथील गणेशवाडी येथे शेतकरी ब्रह्माजी चासकर यांच्या शेतात दोन दिवसापूर्वी मेंढपाळांचा वाडा बसला होता. त्यावेळी शेतात मेंढपाळ अण्णा पांडुरंग कोळपे यांच्या मेंढ्या चरत असताना बिबट्याने भर दुपारी मेंढीवर हल्ला करत तिला ठार केल्याची घटना घडली होती.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. सदर ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे,अशी मागणी होत होती.
सदर घटनेची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक रईस मोमीन यांनी बेस कॅम्प गावडेवाडी यांच्या सहाय्याने त्या ठिकाणी सोमवार, दि.२३ रोजी पिंजरा लावला होता. पिंजऱ्यात बुधवार, दि.२५ रोजी पहाटे बिबट्या जेरबंद झाला आहे. बिबट मादी असून अंदाजे चार ते साडेचार वर्षाची आहे. या बिबट मादीने चास परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या होत्या.
बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. यावेळी बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी राजेश चासकर, मनोज तळेकर, चारुदत्त बांबळे, कुणाल गावडे, हर्षद चौधरी, प्रकाश शिंदे यांची मदत लाभली. जरेबंद केलेल्या बिबट मादीला पुढील कार्यवाहीसाठी माणिकडोह निवारण केंद्रात पाठविण्यात आले असल्याची माहिती वनपाल सोनल भालेराव यांनी दिली.





