पुणे जिल्हा : आळेफाटा बायपास मार्गावर वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू

आळेफाटा – जुन्नर तालुक्यातील आळेफाटा बायपास महामार्गावर शुक्रवारी (दि. 22) रात्री रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेने मादी बिबट्याचा मृत्यू झाला आहे.
जुन्नर तालुक्यातील असणारी बिबट्यांची संख्या ही दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने वारंवार रात्रीच्याच वेळी पुणे- नाशिक, कल्याण-नगर किंवा आळेफाटा बायपास या महामार्गाचे रस्ते ओलांडताना बिबट्यांचे अपघात होऊन अनेकवेळा मृत्यू होत असतात.
मध्यरात्री 12च्या सुमारास आळेफाटा बायपास मुकाई मळ्याजवळ महामार्गाचा असणारा रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला आहे. याची खबर वनविभागाचे वनपाल संतोष साळुंखे यांना लागताच तात्काळ घटनास्थळी येऊन वनमजूर व्ही. के. खर्गे, बिबट रेस्क्यू टीमचे सदस्य बाबाजी खर्गे यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने वनविभागाच्या वाहनात टाकण्यास मदत करून मयत बिबट्याला जुन्नर-माणिकडोह या ठिकाणी असणार्या बिबट निवारण केंद्रात दाखल करून शवविच्छेदन करण्यात आले.
बिबट्याचा मयताची माहिती वडगाव आनंद ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर लावून जसे काय बिबट कुटुंबातील सदस्य मयत झाला असून मयत बिबट्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहत पाळीव प्राणी व मानव जातीवर होत असलेल्या हल्ल्याचा एक प्रकारे निषेधच व्यक्त केला आहे. या होत असलेल्या हल्ल्याचा निश्चितपणे राज्य व केंद्र सरकारने विचार करून योग्य ते निर्णय घ्यावा.





