पुणे जिल्हा : तळमजल्यातील एटीएम सेंटरमध्ये कार घुसली

शिक्रापुरात घटना : मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटले
शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरातील एका बिअरबारच्या खालील मजल्यावर असेलल्या एका एटीएम सेंटरमध्ये एका मद्यधुंद चालकाच्या ताब्यातील कार शिरल्याने एटीएमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र जिवितहानी झाली नाही. या घटनेने खळबळ उडाली आहे.
शिक्रापूर येथील चाकण चौक परिसरात बालाजी बिअरबारच्या बिल्डींगमध्ये तळ मजल्यामध्ये आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आहे, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एक मद्यधुंद चालक इमारत समोर उभ्या केलेल्या त्याच्या कारमध्ये बसला, यावेळी त्याने कार चालू केल्यानंतर कार थेट समोरील इमारतीच्या पायऱ्या उतरुन खालील तळ मजल्यात असलेल्या एटीएममध्ये शिरली.
काचा व मशीन तोडून भिंतीवर आदळली. यावेळी एटीएमच्या मशीनसह आदी नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस शिपाई विकास मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत एटीएम सेंटर बंद करत बँकेला माहिती दिली.
याबाबत नामदेव निवृत्ती दळवी (रा. मलठण, ता. दौंड) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे. पोलिसांनी कारवरील चालकावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.





