लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील 23 गावे म्हणजे तब्बल अडीच लाखांपेक्षा आधिक लोकसंख्या पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झाल्याने हवेली तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 7 गट कमी झाले असून नवीन गट रचनेत जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी एक गटाची वाढ झाली आहे. या तालुक्यात गट-गणांच्या रचनेत मोठे फेरबदल होणार असल्याचे स्पष्ट झाले. हवेली तालुक्यात आता 13 ऐवजी 6 गट व 26 ऐवजी 12 गण असतील यावर आता शिक्कामोर्तब झाल्याने नवीन चेहर्यांना संधी मिळण्याची अशा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे निवडणुका घेण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोग सक्रिय झाला आहे. जिल्हा परिषदेची गट रचना व पंचायत समित्यांची गण रचना करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. ही रचना करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी असे निवडणूक आयोगाने आदेश दिल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. मिनी विधानसभेच्या निवडणुकीची चाहूल लागताच हवेली तालुक्यातील प्रतीक्षेत असलेले इच्छुक आगामी निवडणुकीसाठी जोमाने तयारीला लागले आहेत. तीन वर्षांपासून निवडणुकीची आस लावून बसलेल्या इच्छुकांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. तालुक्यात होणारे विविध सुख दुःखाचे कार्यक्रम, लग्र सोहळे, वैयक्तिक भेटीगाठी, वाढदिवसाचे कार्यक्रम व समर्थकांच्या माध्यमातून सोशल मीडियावर इच्छुक अॅक्टिव्ह झाल्याचे पहायला मिळत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार हे गट आणि गणातील लग्न समारंभ, दशक्रिया विधी, धार्मिक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहू लागले आहेत. गावातील विविध समाजांसाठी हे करणार, ते करणार असून प्रलोभने सुरू झाली आहेत. अगदी अडगळीतल्या कार्यकर्त्यांचा सुद्धा आता वाढदिवस साजरा केला जात आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. गावकारभारी झाले रिचार्ज पूर्वी ग्रामपंचायतींना शासनाकडून कमी प्रमाणात निधी मिळत होता. ग्रामविकासाची कामे करण्यास अडचणी येत होत्या. आता प्रत्येक ग्रामपंचायतीला शासनाकडून वित्त आयोगाच्या किंवा विविध हेडच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायती मालामाल झाल्या आहेत. त्यामुळे कारभारी दणकट झाले आहेत. अनेक मतदारसंघात मतरुण व जुने जाणते असाही सामना रंगणार आहे. तरुण आपल्या नवनवीन कल्पकतेच्या जोरावर निवडणूक लढणार की जुने जाणते आपला शिलकीतला डाव टाकून समोरच्या तरुणाला धोबीपछाड करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. निवडणूक काही महिन्यावर आली असली तरी आत्तापासूनच गावकारभारी रिचार्ज झाले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर आपले वर्चस्व असल्यास आगामी विधानसभा निवडणुक सोपी जाते. त्यामुळे आपल्याच पक्षाचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य जास्तीत जास्त निवडून यावेत ही अपेक्षा पुढील विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणा-या इच्छुक आमदारांची असते. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यां बरोबर नेते व गाव कारभारी रिचार्ज झाले आहेत. अनेक जणांना तर सरपंच नव्हे तर जिल्हा परिषद सदस्य होण्याची स्वप्ने पडत आहेत. इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. गावात वेळ देऊ लागले आहेत. त्यांचा गावात राबता वाढला आहे. आठवड्यातून एक – दोन दिवस गावात दिसणारे गाव कारभारी आता रोज दिसू लागले आहेत. आघाडी, युती की बिघाडी? सध्याच्या राजकीय वातावरणावरून महायुती व महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्रितपणे लढणार की वेगवेगळे या बाबतीत संभ्रमावस्था आहे. गट गण रचना व आरक्षण सोडत अद्याप बाकी असले तरी गट गणाचे व आरक्षणाचे अंदाज बांधत इच्छुक मात्र तयारीला लागले आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडी बाजी मारणार का महायुती विजयाचा झेंडा फडकवणार हे निकाल लागल्यानंतरच समजणार आहे. इच्छुकांसह कार्यकर्ते संभ्रमात हवेली तालुक्यात अद्याप निवडणुकी संदर्भात पक्षीय पातळीवर कोणतीच चर्चा झाल्याचे दिसून येत नाही. विधानसभा निवडणूक निकालानंतर कुठल्याच पक्षाने एकही मेळावा किंवा तालुका पातळीवर कार्यकर्त्यांची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात बैठक झाल्याची दिसून येत नाही. हवेली तालुक्यात राज्यात सत्तेवर असणार्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भाजपकडून इच्छुकांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)- मनसे एकत्र आले तर घड्याळ हातात बांधावे, तुतारी वाजवावी, धनुष्याचा बाण ओढावा का रेल्वे इंजिनमध्ये बसावे अशा दुहेरी द्विधा मनस्थितीत इच्छुक उमेदवार व काही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ही मिनी मंत्रालयाची निवडणूक पुढील राजकीय निवडणुकीची खरी तालीम असणार आहे. त्यामुळेच सर्व दिग्गज नेते ही स्थानिक निवडणूक आपल्याकडे खेचून घेण्यासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून आहेत.