शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन स्कॉर्पिओसह पोलिसांनी 53 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी वैष्णव वैजनाथ ढाकणे, स्वप्नील गोरक्षनाथ खेडकर, हर्षद देविदास खेडकर, शुभम बंडू जवरे, तुषार रामनाथ जवरे, अक्षय कांतीलाल आव्हाड या सहा जणांना अटक केली आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे -नगर महामार्गावरून दोन पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधून काही युवक गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांना मिळाली, त्यांनतर पोलीस निरीक्षक दिपरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर- पुणे -नगर रस्त्यावर सापळा लावला असता त्यांना दोन पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ आल्याचे दिसून आले, यावेळी पोलिसांनी दोन्ही स्कॉर्पिओमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये गांजा आढळला. दरम्यान, पोलिसांच्या पथकाने दोन्ही स्कॉर्पिओसह त्यामध्ये असलेला तब्बल 53 किलो गांजा जप्त करत गांजा वाहतूक करणाऱ्या युवकांना ताब्यात घेत, वैष्णव वैजनाथ ढाकणे (वय २३ वर्षे रा. हासनपूर ता. शेवगाव जि. अहिल्यानगर), स्वप्नील गोरक्षनाथ खेडकर (२२), हर्षद देविदास खेडकर (२० दोघे रा. एकनाथवाडी ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर) , शुभम बंडू जवरे (२१) व तुषार रामनाथ जवरे (२१ दोघे रा. वाडगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर), अक्षय कांतीलाल आव्हाड (वय २६ वर्षे रा. करमाळा रोड राशीन ता. कर्जत जि. अहिल्यानगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे.