Pune district: पहिल्याच दिवशी ४५ शेळी, मेंढ्यांची आवक

बारामती : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने शिर्सुफळ ग्रामपंचायतीची मागणी विचारात घेऊन शिर्सूफळ येथे नव्याने शेळी-मेंढी बाजाराचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती विश्वासराव आटोळे व सरपंच जुईताई हिवरकर यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्या दिवशी ४५ शेळी मेंढीची आवक झाली तर २० मेंढ्याची विक्री होऊन साधारण लाखाचे आसपास उलाढाल झाली.
शेतकरी बाळु किसन हिवरकर यांचे मेंढ्यास १८ हजार रुपये दर मिळाला तर विनोद गुळुमकर यांनी खरेदी केला. बाळू हिवरकर, महादेव म्हेत्रे, माणिक कांबळे या शेतकऱ्यांनी शेळी मेंढी विक्रीस आणल्या होत्या. बारामती बाजार समितीने राबविलेला हा स्तुत्य उपक्रम असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली सूचना व ग्रामपंचायतीच्या अनुमतीमुळे गावाचे विकासात भर पडणार आहे, असे सभापती आटोळे यांनी चर्चेवेळी विचार मांडले. जुईताई हिवरकर म्हणाल्या की, समितीने सुरू केलेल्या बाजारामुळे गावातील व परिसरातील शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे.
भविष्यात शिर्सुफळ गावात बाजार समितीचा पेट्रोल पंप असावा, अशी मागणी केली. त्यामुळे परिसरातील लोकांची व शेतक-यांची सोय होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी सभापती सुनील पवार, आप्पासाहेब आटोळे यांनी मार्गदर्शन केले. यापुढे प्रत्येक शुक्रवारी शेळी मेंढी बाजार सुरू राहील. भविष्यात बाजारात विविध सुविधा पुरविल्या जातील. असे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.
यापूर्वी शिर्सुफळ परिसरातील शेतकरी शेळी- मेंढी विक्रीसाठी यवत, भिगवण, काष्टी या ठिकाणी जात होते. त्यांची सोय बारामती तालुक्यात व्हावी या उद्देशाने खरेदी विक्री सुरू केल्याचे सभापती यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपसरपंच हिराबाई झगडे, दूध संघाचे माजी व्हाईस चेअरमन शिवाजी झगडे, बाजार समितीचे उपसभापती रामचंद्र खलाटे, माजी सभापती अनिल हिवरकर, बाजार समितीचे सदस्य बापूराव कोकरे, सतीश जगताप, संतोष आटोळे, अरूण सकट, दिलीप परकाळे, विलास कदम, अतुल हिवरकर, गणेश सातपुते, सोमनाथ हिवरकर, विजय शिंदे, आप्पासाहेब झगडे, पोपट धवडे, सूरज हिवरकर उपस्थित होते. सूत्रसंचलन रमेश हिवरकर यांनी केले. माजी उपसरपंच सदाशिव आटोळे यांनी आभार मानले.





