पुणे जिल्हा : 31 कारभाऱ्यांसाठी 108 उमेदवार रिंगणात

बारामतीत 31 ग्रामपंचायतींचा फड रंगला : प्रचार तोफा आज थंडावणार
नवनाथ बोरकर
डोर्लेवाडी – राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. यात बारामती तालुक्यातील 32 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया दोन दिवसांवर ठेपली आहे. एक सरपंचपद बिनविरोध झाले आहे. 31 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी 31 जागांसाठी 108 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत तर सदस्यपदांसाठी 253 जागांसाठी एकूण 579 उमेदवारांनी मैदानात शड्डू ठोकला आहे. बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये अटीतटीच्या लढती होत आहेत. जेवणावळीची लगबग सर्वत्रच दिसत आहे. यामुळे हॉटेल गजबजून गेली आहेत.
तालुक्यातील 32 ग्रामपंचायतची निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. काटेवाडी, गुणवडी, डोर्लेवाडी, शिर्सुफळ, कोऱ्हाळे खुर्द, कऱ्हावागज, मुंडाळे, मेडद, काळखैरेवाडी, सुपा, साहेबाची वाडी, वंजारवाडी, पानसरेवाडी, दांडवाडी, भोंडवेवाडी, कुतवळवाडी, आंबी बुद्रुक, चांदगुडेवाडी, गाडीखेल, साबळेवाडी, मानाप्पावस्ती, म्हसोबानगर, पवईमाळ, धुमाळवाडी, करंजे, चौधरवाडी, करंजेपूल, मगरवाडी, जराडवाडी, उंडवडी कप, पारवड, निंबोडी या गावांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या काटेवाडीत मोठी चुरस आहे. पवार हे राज्यामध्ये भाजपबरोबर सत्तेत आहेत.
त्यांच्याच गावात भाजपचे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि पुणे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी संपूर्ण पॅनल उभा करून अजित पवार गट राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलपुढे तगडे आव्हान उभे केले आहे. पवार गटाच्या राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलला काटेवाडीचा गड राखण्यात यश येणार का, याकडे लक्ष लागले आहे. या ठिकाणी सरपंचपदासाठी तिरंगी लढत आहे. मात्र सरपंचपदांच्या उमेदवारांमध्येच खरी लढत ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, अशी आहे.
यंदाची दिवाळी धूमधडाक्यात
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत अत्यंत चुरस निर्माण झाली आहे. सरपंच पदासाठी रोहिणी हरिभाऊ आटोळे, ज्योती अतुल भोपळे, सुप्रिया मनोज नाळे व प्रभावती कांतीलाल नाळे या चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये रोहिणी आटोळे आणि सुप्रिया नाळे यांच्यात खरी लढत होईल, अशी चर्चा चौका- चौकात जनतेत रंगू लागली आहे. जनतेतून सरपंच निवड होणार असल्याने मतदार कोणाला कौल देणार याकडे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे यंदाची दिवाळी निवडून येणाऱ्या उमेदवाराबरोबर जनतेची आनंदाची आणि गोड होईल, अशी चर्चा देखील रंगू लागली आहे.
डोर्लेवाडीत सरपंचपदासाठी तिरंगी लढत
डोर्लेवाडी- डोर्लेवाडी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंच पदासाठी तिरंगी लढत होत आहे. यात सत्ताधारी व विरोधी पॅनलला डावलून सूज्ञ मतदार स्वाभिमानी अल्पसंख्यांक जनसेवा पॅनलच्या सरपंचपदाच्या उच्चशिक्षित उमेदवाराकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.





