Pune District : आंबेगाव तालुक्यात १ लाख कोंबड्या, पाच टन मटन फस्त

-चिकन आणि मटन खरेदीसाठी दुकानाच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा
मंचर – आंबेगाव तालुक्यात जवळपास १ लाख बॉयलर कोंबड्यांची आणि ५ टन मटण खवय्यांनी बुधवार, दि.२३ रोजी फस्त केल्याची माहिती दुकानदारांनी दिली. चिकन आणि मटन खरेदीसाठी दुकानाच्या बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
आषाढ महिन्याच्या शेवटच्या बुधवारी आणि त्या अगोदर आलेल्या रविवारी चिकन आणि मटण विक्रेत्यांकडून ग्राहकांनी चिकन-मटन खरेदी केल्यामुळे लाखो रुपयाची बाजारपेठेमध्ये उलाढाल झाली. प्रामुख्याने मंचर,एकलहरे, कळंब,अवसरी,घोडेगाव,पारगाव या बाजारपेठांमध्ये ग्राहकांनी चिकन-मटन खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. हिंदू धर्मात श्रावण आणि भाद्रपद या दोन महिन्यात मांसाहार पूर्णपणे वर्ज असल्यामुळे शेवटच्या बुधवारी व रविवारी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर चिकन,मटण व मासळी खरेदी केली.
त्यामानाने अंड्याला उठाव नसल्याचे अंडी उत्पादक शेतकरी गोविंद थोरात,निकेतन दैने, माया थोरात यांनी सांगितले. जवळपास १ लाख बॉयलर कोंबड्यांची आणि ५ टन मटणाची विक्री झाल्याची माहिती कळंब आणि एकलहरे येथील विक्रेते इसाक शेख तसेच मंचर येथील आरीफ इनामदार, शारूफ इनामदार,घोडेगाव येथील विक्रेते जावेद मिस्त्री,फिरोज मिस्त्री आणि एकलहरे येथील मटणाचे विक्रेते शेखर कांबळे यांनी सांगितले आहे.
एकलहरे येथे मटन खरेदीसाठी तालुक्यातील अनेक गावांमधून ग्राहकांनी येवून मेंढराचे व बोकड्याचे मटण घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. मटणाचे दर ७२० ते ७४० रुपये किलो दराप्रमाणे विकले गेले. तसेच मुंडी आणि वजेडीला सुद्धा विशेष मागणी असल्याचे मटण विक्रेते निखील कांबळे आणि अमर कांबळे व बकरीचे व्यापारी संतोष कांबळे यांनी सांगितले. चिकन सर्रासपणे २०० ते २२० रुपये किलो दराने विकले गेले. गुरूवारी गटारी अमावस्या होती.तरी सुद्धा ग्राहकांनी दुकानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
आषाढ महिन्याच्या शेवटच्या बुधवारी तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये घरगुती देवाचे कोंबडे,बकरे कापण्यासाठी नागरिकांनी मोठी लगबग होती. शेवटच्या दिवशी अनेक नागरिकांना गावठी कोंबडे न मिळाल्यामुळे देवाचा नवसाचा कार्यक्रम करता आला नाही.गावठी कोंबड्यांची बुधवारी ५०० ते ८०० रुपयांपर्यंत विक्री झाली.
– इसाक शेख, चिकन विक्रेते, कळंब-एकलहरे.





