पुणे – एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभाराची अजून एक घटना शुक्रवारी प्रवाशांना अनुभवायला मिळली. पुण्याहुन भोरकडे जाणारी बस शिंदेवाडी येथे तांत्रिक कारणामुळे बंद पडली. त्यानंतर संबंधित बसचालकाने एसटी आगारामध्ये याबाबत माहिती दिली. मात्र पुणे आणि भोर एसटी आगारांच्या हद्दीच्या वादामुळे तब्बल तासभर “बॅकअप एसटी’ पोहचलीच नाही.
त्यामुळे प्रवाशांना तासभर ताटकळत गाडीची वाट पहावी लागली. हा प्रकार शुक्रवारी रात्री 11 वाजता घडला. त्यामुळे, अनेक प्रवाशांनी खासगी वाहनांचा आधार घेत घर गाठले. मात्र, या प्रकारामुळे आधीच तोटयाच्या गर्तेत असलेल्या एसटी प्रशासनाच्या प्रवासी केंद्रीत कारभाराचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
“सर्वसामान्यांसाठीची लालपरी’ अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसकडे विश्वासार्ह वाहन म्हणून पाहिले जाते. या बसेस मार्गावर बंद पडल्यास, आगारातून तातडीने स्पेअर बस उपलब्ध करून देण्यात येते, असा विश्वास नागरिकांच्या मनात असतो. मात्र शुक्रवारी रात्री घडलेल्या प्रकारामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
स्वारगेटहून भोरसाठी जाणारी बस शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रवाना झाली. मात्र साधारण 20 किलोमीटर अंतरावर बसचा एअर प्रेशर पाईप तुटला. यामुळे बस शिंदेवाडी गावाजवळ रात्री 10.15 च्या सुमारास थांबली. यानंतर कर्मचाऱ्यांनी आगारामध्ये संपर्क साधला. पण बस उपलब्ध झाली नाही. संबंधित बसच्या चालकांकडून हद्दीच्या कारणामुळे स्पेअर बसेस उपलब्ध न झाल्याचे उत्तर प्रवाशांना देण्यात येत होते.
अखेरीस 11 वाजता भोर आगारातून स्पेअर बस सोडण्यात आली. ही बस 12 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहोचली. मात्र यापूर्वी प्रवाशांनी नातेवाईकांनी बोलावून घरी गाठण्याचा पर्याय स्वीकारला. सुमारे दीड तासाच्या अंतराच्या प्रवासात, एका तासापेक्षा अधिक वेळ प्रवाशांना रस्त्यातच ताटकळत थांबावे लागले. अन्य कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध न झाल्याने प्रवासी हतबल झाले होते.
“आगारामध्ये बस उपलब्ध होती. आम्हाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेच म्हणजेच साधारण 11 वाजण्याच्या सुमारास तातडीने स्पेअर बस शिंदेवाडीसाठी पाठवण्यात आली. ही बस 11.55 च्या दरम्यान त्या ठिकाणी पोहोचली. मात्र तोपर्यंत प्रवासी निघून गेले होते. हद्दीबाबत अडचण उपस्थित करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे याबाबतची चौकशी करण्यात येणार आहे.” – युवराज कदम (भोर आगार व्यवस्थपक)