पुणे : न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या नागरीकांना आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर वैद्यकीय उपचार मिळावेत, या उद्देशाने शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दवाखाना सुरू करण्यात आला आहे. नवीन इमारतीच्या तळमजल्यावर न्यायालय प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या दवाखान्यात अत्यावश्यक सेवेसह प्राथमिक उपचार मिळणार आहेत. शिवाजीनगर न्यायालयात दवाखान्यासाठी तत्कालीन कार्यकारिणीने पाठपुरावा केला होता. शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात कामकाजासाठी आल्यानंतर यापूर्वी हृदयविकाराचा झटका, चक्कर येणे, बेशुद्ध होणे यासारख्या घटना घडल्या होत्या. यावेळी, न्यायालयातील रुग्णवाहिकेतून रुग्णाला दवाखान्यात नेण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. यावेळी, न्यायालयासह रस्त्यावरील कोंडीमुळे रुग्णाला तत्काळ बाहेर काढणे मोठ्या जिकीरीचे बनले होते. न्यायालयात प्राथमिक उपचाराची कोणतीही सुविधा नसल्याने त्याचा फटका रुग्णांना बसत होता. त्यापार्श्वभूमीवर पुणे बार असोसिएशनमार्फत तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष जयश्री चौधरी-बिडकर, विश्वजित पाटील यांच्यासह कार्यकारिणीने पाठपुरावा केला.