Pune : नव्या टर्मिनलवरुन लवकरच “डिजियात्रा’

पुणे : लोहगाव येथील विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर दि. ८ फेब्रुवारीपासून “डिजियात्रा’ प्रणाली कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत या सेवेचा प्रारंभ होणार आहे.
“डिजियात्रा’ ही सेवा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जुन्या टर्मिनलवर कार्यान्वित होती. मात्र, नवीन टर्मिनलवर “डिजियात्रा’ सेवा प्रतीक्षेत होती. नवीन टर्मिनल सुरु होऊन सात महिने झाले होते. तरी “डिजियात्रा’ सुरू झाले नव्हती. यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. या संदर्भातील सर्व परवानग्या आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या असून ही प्रणाली सेवेसाठी सज्ज होत आहे. देशांतर्गत प्रवाशांसाठी विमानतळ प्रवास सोपा आणि सोयीस्कर करण्यासाठी डिजीयात्रा सुविधा सुरू करण्यात आली आहे.
देशभरात १ डिसेंबर २०२२ पासून डिजीयात्रा सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रणाली अंतर्गत ८० लाखांहून अधिक प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. तसेच ४ कोटींहून अधिक वेळचा प्रवास या सेवेतून झालेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या डिजी यात्राचे वापरकर्ते वाढत आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कायापालट होत असून हे विमानतळ अधिकाधिक अद्ययावत सोईसुविधांयुक्त करण्यासाठी विविध पातळ्यांवर काम सुरु आहे. डिजी यात्रा पूर्णपणे बायोमेट्रिक सेल्फ-बोर्डिंग सिस्टम देते, ज्यामुळे प्रवाशांना प्रवेशद्वारापासून विमानात पोहोचेपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडता येते.
पुणे विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या डिजी यात्री वापरकर्त्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नवीन टर्मिनलवर डिजी यात्रा सुरू होणार असल्याने पुणेकरांना विमान प्रवास करताना त्याचा फायदा होणार आहे.
– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री





