Pune: धंगेकरांनी कसब्यातून क्रांतीची मशाल पेटवली : संजय राऊत

पुणे – आमदार रवींद्र धंगेकर यांनी कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतून क्रांतीची मशाल पेटवली. या पोटनिवडणुकीत कसब्यातील नागरिकांनी जो निकाल दिला, त्यानंतरच हा मतदारसंघ ठळकपणे महाराष्ट्राच्या नकाशावर आला. येथील मतदार याही निवडणुकीत हाच निर्णय कायम ठेवतील आणि धंगेकर यांना विजयी करतील, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
लोकमान्य सभागृह केसरीवाडा येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार राऊत बोलत होते. या कार्यकर्ता मेळाव्याला अंकुश काकडे, संजय मोरे, गजानन थरकुडे, मोहन जोशी, रोहित टिळक, बाळासाहेब अमराळे, नीता परदेशी, गणेश नलावडे उपस्थित होते.
राऊत म्हणाले, की कसब्यातील शिवसैनिक जोरात आहेत. ते धंगेकर यांना समर्थपणे साथ देतील. आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकमेकांना मदतीचा हात देऊन पुण्यात यश मिळवलेच पाहिजे. एकेकाळी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आज कोयता गॅंगचे शहर, भ्रष्टाचाराचे शहर अशी झाली आहे. त्याला सध्याचे सत्ताधारीच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना सत्तेतून खाली खेचावे. कसब्यातून आपण मोठ्या मताधिक्याने विजय होऊ, असा विश्वास आमदार धंगेकर यांनी या मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.
जैन बांधवांच्या शुभेच्छा
दरम्यान, चातुर्मास परिवर्तन दिवसाच्या निमित्ताने आमदार रवींद्र धंगेकर यांनी दादावाडी जैन श्वेतांबर मंदिर येथे साकारण्यात आलेल्या शत्रुंजय गिरीराज पर्वत म्हणजेच शत्रुंजयपटाचे दर्शन घेतले. या दिनानिमित्त जैन साधू एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी विहार करतात. त्यामुळे जैन समाजात या दिवसाला खूप महत्त्व असते. या वेळी रमेश बोराणा, कांतिलाल पार्लेचा, सुरेश जैन, शांतिलाल जैन, संपत जैन आदी उपस्थित होते. उपस्थित जैन बांधवांनी या वेळी आमदार रवींद्र धंगेकर यांना शुभेच्छा दिल्या.





