Pune : गावरान आंबा, डाळिंब, मोसंबी, पपईला मागणी

पुणे : पावसाने उघडीप दिल्यामुळे गावरान आंब्यांची आवक वाढली होती. त्या तुलनेत मागणीही जास्त आहे. त्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत आंब्यांच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती आंब्याचे व्यापारी युवराज काची यांनी दिली, तर पपई, मोसंबी, डाळिंबाला मागणी वाढली आहे. त्या तुलनेत आवक होत असल्यामुळे या तिन्ही फळांचे भाव स्थिर आहेत.
हवामान बदलामुळे कलिंगड, खरबूज आणि लिंबांची मागणी घटली आहे. त्यामुळे भावात घाऊक बाजारात किलोमागे २ ते ३ रुपयांनी घट झाली आहे. लिंबासह उर्वरित सर्व फळांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
येथील फळबाजारात रविवारी (दि. १) मोसंबी ३० ते ३५ टन, डाळिंब २५ ते ३० टन, पपई १२ ते १५ टेम्पो, लिंबांची सुमारे १ हजार ७०० गोणी, कलिंगड १५ ते २० टेम्पो, खरबूज १० ते १२ टेम्पो, चिकू २ हजार बॉक्स, पेरू ३०० ते ४०० क्रेटस्, अननस ३ ट्रक इतकी आवक झाली होती. गावरान कच्च्या हापूसला घाऊक बाजारात किलोस दर्जानुसार ३० ते ७० रुपये, पायरीला २० ते ५० रुपये, केशरला ३० ते ९१ रुपये अणि बदामला २० ते ४० रुपये भाव मिळत आहे.
कर्नाटक आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात
कर्नाटक टुंकूर भागातील आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसांत आंब्याला मागणी नव्हती. मात्र, मागील दोन दिवसांत मागणी वाढली आहे. या वेळचा हंगाम अतिशय वाईट गेल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. रविवारी (दि. १) १० हजार लाकडी पेट्यांची आणि २ डझनाच्या २ हजार पेट्यांची आवक झाली. हापूसच्या ३ ते ५ डझनाच्या पेटीला ८०० ते १२०० रुपये भाव मिळत आहे, तर २ डझनाच्या पेटीला ३०० ते ५०० रुपये भाव मिळत आहे. पायरीला ४ डझनाच्या पेटीला ६०० ते ८०० रुपये भाव मिळत असल्याची माहिती कर्नाटक आंब्याचे व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली.





