पुणे: ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’ची दिल्लीत तपासणी

महाराष्ट्रातून साडेतीन हजार नमुने पाठवले
पुणे – राज्यातील 36 जिल्ह्यांतून प्रत्येकी 100 असे 3,600 स्वॅब सॅम्पल “डेल्टा प्लस व्हेरिएंट जिनोम सिक्वेन्सिंग’साठी दिल्लीतील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. यातून राज्यातील “डेल्टा प्लस व्हेरिएंट’चा “स्प्रेड’ समजणार आहे. जुलै अखेरपर्यंत हा अहवाल येणे अपेक्षित आहे.
करोना विषाणूत होणाऱ्या जनुकीय बदलांचा परिणाम दुसऱ्या लाटेत झाला आणि त्याची तीव्रता एवढी होती की, बाधित आणि मृत्यू पावलेल्यांची संख्या जास्त होती. या व्हेरिएंटची तपासणी पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत झाली होती.
सध्याच्या “डेल्टा प्लस व्हेरिएंट’च्या फैलावाची तीव्रता तपासण्यासाठी “जिनोम सिक्वेन्सिंग’ करावे लागणार आहे. मात्र, ही बाब खर्चिक असल्याने राज्यातील बाधितांचे नमुने दिल्लीतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
यासाठी राज्यसरकारने यावर्षी एप्रिलमध्येच दिल्लीच्या “सीएसआयआर’ (इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटेग्रेटिव्ह बायोलॉजी) या संस्थेची सांमजस्य करार केलेला आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रातील करोना बाधितांतील विषाणूचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येत आहे. यावर नियंत्रण आणि त्याचा समन्वय राज्याच्या वैद्यकिय शिक्षण आणि औषधीद्रव्ये विभागाकडे देण्यात आला आहे.
…म्हणून निर्णय
मे महिन्यात “डेल्टा प्लस व्हेरिएंट’चे 21 रुग्ण आढळले होते. तसेच एका वृद्ध महिलेचा मृत्यूही झाला. त्यामुळेच राज्य सरकार अधिक सतर्क झाले आणि राज्यभरातून सॅम्पल तपासणीचा निर्णय घेण्यात आला.
असा आहे करार
महाराष्ट्रातील 3,600 करोनाग्रस्तांचे नमुने म्युटंटच्या तपासणीसाठी दिल्लीला पाठवण्यात येतील. जिल्ह्याच्या क्षेत्रफळ आणि लोकसंख्येनुसार नमुन्यांची संख्या वैद्यकीय शिक्षण विभाग ठरवेल. मे, जून आणि जुलै या काळात करोना निदानासाठी घेतलेल्या नमुन्यांच्या चाचण्या होणार. या चाचण्यांसाठी 1 कोटी 62 लाख रु. खर्च अपेक्षित आहे. तो मुख्यमंत्री सहायता निधीतून होईल.





