पुणे : कोथिंबिरीच्या भावात घसरण ; मार्केट यार्डात लातुर आणि धाराशीवमधून आवक

पुणे – पुणे विभागासह धाराशिव, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कोथिंबिर विक्रीस पाठविली आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने कोथिंबिरीच्या भावात घट झाली आहे.
कोथिंबिरच्या एका जुडीचे 15 दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात 25 ते 30 रुपयांपर्यंत भाव होते. मार्केट यार्डातील तरकारी विभागात पुणे जिल्ह्यातून कोथिंबिरची आवक होते. लातूर, धाराशिव जिल्ह्यात कोथिंबिरची लागवड मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे बाजाराभावात घट झाली आहे.
घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या जुडीला प्रतवारीनुसार 5 ते 12 रुपये भाव मिळाल्याची माहिती मार्केट यार्डातील पालेभाज्यांचे व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली. किरकोळ बाजारात 10 ते 20 रुपये भावाने विक्री होत आहे.
यंदा परतीच्या पाऊस कमी झाल्याने कोथिंबिरची प्रतवारी चांगली आहे. कोथिंबिरची लागवड चांगली झाल्याने आवक वाढून भावात घट झाली आहे. पुढील 15 ते 20 दिवस कोथिंबिरचे भाव स्थिर राहतील, असेही सुर्यवंशी यांनी सांगितले.
मेथीची भाजीही स्वस्त…
पितृपक्षात मेथीचे भाव तेजीत होते. नवरात्रोत्सवात मेथीचे भाव टिकून होते. लातूर जिल्ह्यातून मेथीची आवक मोठ्या प्रमाणावर होत असून, बाजारात दररोज एक लाख जुडींची आवक होत आहे. घाऊक बाजारात मेथीच्या शेकडा जुडीला 5 ते 8 रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात 10 ते 20 रुपये भावाने जुडीची विक्री होत आहे.





