Pune : बांधकाम परवानगी अधिकाराचे पीएमआरडीएत विकेंद्रीकरण

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) क्षेत्र मोठे असल्यामुळे काही वेळा नागरिकांना अडचणी येतात. त्या तातडीने दूर व्हाव्यात यासह कामकाजात सुलभता येण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी बांधकाम परवानगी विभागातील कामकाजाच्या विकेंद्रीकरणाचा निर्णय घेतला आहे.
पीएमआरडीए मधील बांधकाम विभागाकडील सर्वच प्रकरणे सरसकटपणे आयुक्त अथवा अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केली जातात. विकास परवानगी विभागातील कामकाजाचे सुव्यवस्थित नियंत्रण व कामांचा जलद गतीने निपटारा व्हावा, तसेच सुकर जीवनमान अंतर्गत प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. म्हसे यांनी अधिकाराचे विकेंद्रीकरण केले आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले आहे.
सहाय्यक महानगर नियोजनकार यांना 1000 चौ.मी. पर्यंतचे सर्व बांधकाम परवानगी, जोते प्रमाणपत्र, रेखांकन परवानगी, गुंठेवारी व भोगवटा प्रमाणपत्र मंजुरीचे अधिकार देण्यात आले आहेत. 1001 ते 2000 चौ.मी. पर्यंतचे अधिकार उप महानगर नियोजनकार, 2001 ते 4000 चौ.मी. पर्यंतचे अधिकार सह महानगर नियोजनकार, 4001 ते 10000 चौ.मी. पर्यंतचे अधिकार विकास परवानगी व नगर रचना विभागाचे संचालक यांच्याकडे देण्यात आले आहेत.
अतिरिक्त महानगर आयुक्त यांच्याकडे 10001 ते 20000 चौ.मी. पर्यंतचे तर 20001 चौ.मी. पुढील अधिकार महानगर आयुक्त यांच्याकडे असणार आहेत.




