Pune : जीवघेणा शाॅर्टकट…

पुणे : महामेट्रोकडून नारायणपेठेतून डेक्कन स्थानकात जाण्य़ासाठी अजस्त्र असा लोखंडी पादचारीपूल उभारला जात आहे. या पुलाच्या कामासाठी हजारो टन वजनाचा लोखंडी साचा बसविण्य़ात येत आहे. त्यामुळे भिडेपूल वाहतूक तसेच नागरिकांसाठीही बंद केलेला आहे.
असे असले तरी पुलावरून दररोज शेकडो नागरीक धोका पत्करून ये-जा करत आहे. नागरिकांसाठी हा पूल बंद असल्याचा सूचना फलक महामेट्रोने लावला आहे. तसेच बॅरीकेडींग केले आहे. नागरिकांना रोखण्यासाठी नेमलेले सुरक्षा रक्षक याकडे दुर्लक्ष करत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, वळसा टाळण्यासाठी घेतल्या जात असलेल्या शाॅर्टकटमुळे एखाद्याचा जीव जाण्याची वाट महामेट्रो पाहतेय का असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.
फुटओव्हर ब्रीजच्या कामामुळे भिडेपूल वाहने तसेच पादचाऱ्यांसाठी १५ ऑगस्टपर्यंत बंद केला आहे. सध्या फुटओव्हर ब्रीजला आधार देणारे लोखंडी सांगाडे उभारले जात आहेत. बांधकामाचे जड सामान आणि वस्तू उचलणाऱ्या क्रेन्सही पुलावर उभ्या आहेत. अशावेळी फुटओव्हर ब्रीजसाठी लावलेला एखादा लोखंडी भाग खाली पडून अपघात होऊ शकतो.
पूल बंद असल्याने नागरिकांना डेक्कनवरून नारायण पेठेत येण्य़ासाठी झेड ब्रीजवरून वळसा मारून यावे लागते. ते टाळण्यासाठी अनेक नागरीक जीव मुठीत घेवून हा पूल ओलांडताना दिसत आहे. येथील सुरक्षारक्षकाकडे चौकशी केली असता नागरिक आमचे ऐकत नाहीत, बऱ्याच वेळा भांडणे काढतात असे सांगतात. नागरिकांबरोबरच महामेट्रोचे कर्मचारीही सुरक्षा साधनांशिवाय परिसरात वावरतात. अशा बिनधास्त कर्मचाऱ्यांना बघून नागरिक पुलावरून ये-जा करत आहे. कर्मचाऱ्यांकडेही याबाबत विचारणा केली असताना त्यांनी बोलण्याचे टाळले.
महामेट्रोने हात झटकले
रस्ता वापरला जाऊ नये म्हणून आम्ही पुलावर बॅरिकेट लावले आहेत. कामगारांना वापरण्यासाठी ठेवलेल्या जागेचा वापर नागरिक करतात. सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तर नागरिक भांडणावर उतरतात, त्यात सुरक्षारक्षकाकडे कोणतेही पोलिसांचे अधिकार नसल्याने ते काही करू शकत नसल्याची प्रतिक्रीया महामेट्रोचे जनसंपर्क प्रमुख हेमंत सोनावणे यांनी दिली. तसेच या ठिकाणी अजून सुरक्षारक्षक नेमण्याचा विचार आम्ही करू. मात्र, तरीही नागरिक हा धोका पत्कारत असतील तर त्यांनी तसे करू नये असेही ते म्हणाले.





