Pune : नाल्यातील मृत डुक्करांमुळे खळबळ

कोथरूड : पौड रस्त्यावरील भारतीनगर-भिमाले टाॅवर परिसरातील नाल्यात मागील चार दिवसांपासून डुक्कर मृत अवस्थेत आढळून येत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आत्तापर्यंत सात ते आठ डुक्कर मृत अवस्थेत आढळून आल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. यामागील कारण शोधून उपाययोजना कराव्या आणि नागरिकांच्या आरोग्यांची काळजी घ्यावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चा शहर सरचिटणीस दुष्यंत अनिल मोहोळ यांनी केली आहे.
पुणे महापालिकेचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. सारिका फुंडे-भोसले यांना निवेदन देण्यात आले आहे. गुरूवारी (दि. ६) महापालिका आरोग्य प्रमुख मीना बोराडे यांनाही निवेदन देऊन, या प्रकाराची गंभीर दखल करून तपास करण्यात यावा, तसेच मृत डुक्करांची विक्री होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी दुष्यंत मोहोळ यांनी केली.
भारतीनगर-भिमाले टाॅवर परिसरातून जात असलेला नाल्यात डुक्करांचा वावर वाढला आहे. एकापाठोपाठ एक डुक्कर मरत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्याबाबत नागरिकांनी दुष्यंत मोहोळ यांच्याशी संपर्क साधला असता, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तत्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली. मोहोळ यांनी संबधित अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त विजय नायकल, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यासह अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत डुक्कर उचलून तत्काळ औषध फवारणी करण्याच्या सूचना केल्या. आज पुन्हा नव्याने आठ ते दहा डुक्कर मृत अवस्थेत सापडल्याचे समोर आले.
मृत डुक्करांची संख्या अधिक असून नक्की कोणत्या आजारामुळे हे डुक्कर मरत आहेत की अन्य काही कारणे आहेत, याचा शोध घ्यावा. मृत डुक्कर तत्काळ उचलून परिसर निर्जंतुकीकरण करण्यात यावे. नाला आणि परिसरात सर्व डुक्करांना पकडून कोथरूड डुक्करमुक्त करावे. अनधिकृत डुक्कर पालन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
– दुष्यंत मोहोळ, सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा पुणे शहरमृत डुक्करांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल २४ तासांत येईल. त्यानंतर या डुक्करांच्या मृत्युचे कारण समोर येईल. तत्पूर्वी परिसरातील सर्व डुक्करांची पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
– डाॅ. सारिका फुंडे-भोसले , मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी, पुणे मनपा





