Pune : सांस्कृतिक केंद्राचे बुकिंग आता ऑनलाइन

पुणे : सांस्कृतिक, राजकीय तसेच वेगवेगळ्या संस्थांच्या कार्यक्रमांसाठी महापालिकेकडून शहरातील महापालिकेची नाट्यगृहे तसेच सभागृहे भाडेतत्वाने उपलब्ध करून देण्यात येतात. आता, या सभागृहांचे बुकिंग यापुढे आॅनलाइनही करता येणार आहे.
त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून रंगयात्रा हे मोबाइल अॅप्लीकेशन सुरू करण्यात आले आहे. सद्यस्थितीत सांस्कृतिक केंद्रे विभागाकडील प्रशासकीय कामकाज लेखी स्वरुपात सुरु आहे. त्यामध्ये, नाट्यगृहांचे चौमाही आरक्षणासाठी लेखी अर्ज स्वीकारून तारखांचे वाटप करणे, नाट्यगृह भाडे रोख अथवा डीडीने स्वीकारणे त्याची पावती किंवा चलन करणे, अशा कामांचा यात समावेश आहे. आता, नवीन विकसित केलेल्या मोबाइल अॅपद्वारे सांस्कृतिक केंद्रे विभागाकडील वरील सर्व कामकाज ऑनलाइन पद्धतीने संगणक प्रणालीमधून केले जाणार आहे.
या अॅप द्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकाला, नाट्य आयोजक, लावणी आयोजक, इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक संस्था यांना सर्व १५ नाट्यगृहांची सर्व माहिती, आसनक्षमता, सोयीसुविधा, उपलब्धता, पत्ता, इत्यादी माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. नाट्यगृहांची उपलब्धता तपासता येणार आहे. घरबसल्या कोठुनही आरक्षण अर्ज करता येणार आहे.
नाट्यगृह भाडे ऑनलाइन पेमेंट पद्धतीने घर बसल्या भरता येणार आहे. तर रंगयात्रा अॅप कसे वापरायचे याबाबतचा व्हिडीओ अॅपमध्ये आहे. तसेच अॅप बाबत काही अडचण असल्यास केंद्रे विभागाच्या अखत्यारीतील बालगंधर्व रंगमंदिर, श्री गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक बिबवेवाडी येथे मदतकक्षही महापालिकेकडून सुरू करण्यात आला आहे.





