Pune : सावरकरांना अभिवादन करण्यासाठी फर्गसनमध्ये गर्दी

पुणे : सावरकरांचे वास्तव्य असलेली फर्गसन महाविद्यालयातील ऐतिहासिक खोली क्रमांक १७ पाहण्यासाठी नागरिकांनी बुधवारी मोठी गर्दी केली होती.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना फर्गसनमध्ये अभिवादन करण्यात आले. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, कार्यवाह डॉ. आनंद काटीकर, फर्गसनचे प्राचार्य श्याम मुडे आणि उपप्राचार्य प्रा. स्वाती जोगळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सावरकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सावरकरांचे वास्तव्य असलेली फर्गसनमधील खोली क्रमांक १७ नागरिकांसाठी खुली ठेवण्यात आली होती. १९०२ ते १९०५ या काळात विद्यार्थीदशेत सावरकर येथे राहत होते. या खोलीतूनच ‘अभिनव भारत’ सारख्या संघटनेची पायाभरणी, स्वदेशी चळवळीची सुरुवात, विदेशी वस्त्रांची होळी यांसारख्या क्रांतिकारी उपक्रमांची आखणी करण्यात आली.
येथेच त्यांनी ‘सिंहगडाचा पोवाडा’, ‘बाजीप्रभू देशपांडे’ यांसारखी काव्यरचना केली. या खोलीत सावरकरांचा अर्धपुतळा, डी.लिट. पदवीचे गणवेश, वैयक्तिक वस्तू आणि दुर्मीळ छायाचित्रांचे संग्रह पाहायला मिळतो. ही खोली आजही अनेकांना देशभक्तीची प्रेरणा देणारे ठिकाण म्हणून ओळखली जाते.
१९०५ साली विदेशी वस्त्रांची होळी प्रकरणामुळे त्यावेळचे प्राचार्य रँग्लर परांजपे यांनी सावरकरांना वसतिगृहातून वगळले होते. त्यावर लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मधून जोरदार निषेध केला होता. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने या खोलीचे जतन केले असून दरवर्षी सावरकर यांच्या जयंती आणि पुण्यतिथीला ही खोली सर्वांसाठी खुली केली जाते.





