Pune: डीएसके यांच्यावरील गुन्हे सिद्ध करावेत; ठेवीदारांच्या वकिलांचे पुणे पोलीस आयुक्तांना पत्र

पुणे – ठेवीधारकांची फसवणूक केल्याप्रकरणात दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्यावर जवळपास ११ कलमांसह विविध गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर पुरवणी दोषारोपपत्र दाखल झाले आहे. पण, त्यांच्यावरील गुन्हे अद्याप पोलिसांकडून सिद्ध झाले नसल्याने या प्रकरणाची सुनावणी सुरू होण्यास सात वर्षांत मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त आणि विशेष सरकारी वकील यांनी डीएसके यांच्यावरील गुन्हे लवकरात लवकर सिद्ध करावेत
आणि गुन्हयासंबंधी डीएसके यांचे रेकॉर्डिंग जलदगतीने करण्याचे सूचित करावे अशा आशयाचे पत्र डीएसके ग्रुपच्या २४५ ठेवीधारकांच्या वतीने अॅड. चंद्रकांत बिडकर यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना पाठविले आहे. अॅड. बिडकर यांनी पत्रात नमूद केले आहे, की “डीएसके यांनी जवळपास ३५ हजार ठेवीधारकांची फसवणूक केली आहे. ते सुमारे १ हजार १५३ कोटी रुपये परत
मिळण्याच्या दृष्टीने पोलिसांचे सहकार्य अपेक्षित आहे.
आठ वर्षांपूर्वी या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालय विशेष न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये डीएसके गुन्हे दाखल आहेत. सध्या डीएसके यांची येरवडा कारागृहातून जामिनावर मुक्तता झाली आहे. त्यांनी ठेवीदारांना दिलेले धनादेशही बाउन्स झाले आहेत. तर, यातील सुमारे २०० ठेवीदार यांचा मृत्यू झाला आहे आणि एकाने आत्महत्या केली.
यात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ठेवीदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी रक्कम डीएसके कंपनीमध्ये गुंतवली होती. त्यामुळे माझी विनंती आहे, की सहायक पोलीस आयुक्त राजे मोहंमद आणि विशेष सरकारी वकील कैलासचंद्र व्यास यांना सूचना द्याव्यात आणि सहा महिन्यांत हे प्रकरण निकाली काढावे.’





