Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन मोबाईल चोरांना अटक; 13 महागडे फोन जप्त

पुणे : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत भक्तांच्या खिशातील मोबाईल फोन चोरणाऱ्या दोन इसमांना फरासखाना पोलिसांनी शिताफीने अटक केली. या कारवाईत १३ महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून एकूण १ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अलीम मुस्ताक शेख (२६, रा. मालेगाव, नाशिक) आणि अत्तर अहमद एजाज अहमद (२५, रा. मालेगाव, नाशिक) अशी आहेत.
७ सप्टेंबर रोजी रात्री २.३० ते ३.३० वाजताच्या सुमारास बेलबाग चौक, लक्ष्मी रोड, बुधवार पेठ परिसरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान फिर्यादी व त्याच्या दोन मित्रांचे मोबाईल चोरीस गेले. याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सापळा रचला.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पासोड्या विठोबा मंदिराजवळून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मोबाईल चोरीची कबुली दिली. दोघांच्या ताब्यातून १३ महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांची एकूण किंमत १ लाख ७८ हजार रुपये इतकी आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक महेबुब गोकाशी करत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम) राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त (परि-१) कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त (फरासखाना विभाग) अनुजा देशगाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकामध्ये पो.नि. (गुन्हे) उत्तम नागवाडे, अजित जाधव, स.पो.नि. वैभव गायकवाड, अरविंद शिंदे यांच्यासह पोलीस अमंलदार तानाजी नांगरे, नितीन तेलंगे, मनिषा पुकाळे, नितीन जाधव, गजानन सोनुने, महेश पवार, चेतन होळकर आदींचा समावेश होता.





