Pune Crime : ससून रुग्णालयात थरार! उपचारासाठी आलेल्यांवरच कोयत्याने वार; १८ जणांवर गुन्हे दाखल
Pune Crime : जखमींवर उपचार सुरू असतानाच टोळीने ससूनमध्ये घातला राडा; सुरक्षारक्षक आणि रुग्णांमध्ये घबराटीचे वातावरण.

Pune Crime – ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या चौघांवर शस्त्राने वार करण्यात आले. या घटनेत दोन्ही गटातील चाैघे जण गंभीर जखमी झाले असून तिघांना अटक करण्यात आली. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. दोन्ही गटातील १८ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अस्लम हनीफ खान (वय ४२, रा. कुबेरा गार्डन, एनआयबीएम रस्ता, कोढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.असलम खान, त्यांचा मोठा भाऊ सलीम खान आणि पुतण्या अब्दुल समद हे गंभीर जखमी झाले आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शफाक अशफाक शेख (वय २९, रा. भाग्यलक्ष्मी टॉवर), शहबाज झाकीर खान (वय ३१, दोघे रा. भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींसह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ३ फेब्रुवारीला फिर्यादी अस्लम खान हे कौसरबाग येथे गेले होते. या परिसरात काही जण शिवीगाळ करुन धक्काबुक्की करत होते. हे पाहून खान यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली.
आरोपी शफाक आणि साथीदारांनी त्यांना अडवत पोलिसांना दूरध्वनी का केला ? अशी विचारणा केली. ४ फेब्रुवारीला ते कोंढव्यातून निघाले होते. त्यावेळी आरोपी अफाक शफाक आणि साथीदारांनी खान यांना लोखंडी फायटरने मारहाण केली. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविले असताना ससून रुग्णालयात त्यांचा मोठा भाऊ सलीम खान, त्यांचा मुलगा अब्दुल तसेच काही मित्र आले.
ससून रुग्णालय प्रवेशद्वारावर एकाने अस्लम यांच्यावर शस्त्राने वार केला. अस्लम यांचा भाऊ सलीमवरही वार करण्यात आले. दरम्यान, शफाक अश्फाक शेख (वय २९, रा. कोंढवा) यानेही कोंढवा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे तपास करत आहेत.





