प्रभात वृत्तसेवा पुणे – एका खासगी कंपनीच्या महिला संचालिकेला धमकावून ४४ लाखांची खंडणी उकळल्याबद्दल नीलेश घायवळ, भाऊ सचिन आणि साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. नीलेश घायवळविरुद्ध आतापर्यंत सात गुन्हे दाखल आहेत.महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार बापू कदम, नीलेश घायवळ, सचिन घायवळ, पप्पू दळवी, अभि गोरडे, दीपक आमले, बाबू वीर, अमोल बंडगर, बाबू पिसाळ, अमोल लाखे, संदीप फाटक, बबलू गोळेकर, बबलू सुरवसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. तक्रारदार ४० वर्षीय महिला कोथरूडमध्ये राहते. त्यांनी भागीदारीत एक कंपनी सुरू केली आहे. कंपनीचे कार्यालय प्रभात रस्ता परिसरात आहे. कंपनी कर्वेनगर, शिवणे भागातील नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नपदार्थ, तसेच वाहतूक सुविधा पुरविते. कर्वेनगरमधील एका शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून काम करणारा आरोपी बापू कदम याच्याशी महिलेची ओळख झाली होती. २०२४ मध्ये कदमने महिलेची भेट घेतली. माझी कोथरूड भागात डेअरी आहे. शाळेतील उपाहारात दूध, पनीर पुरविण्याचे काम मला द्या, असे त्याने सांगितले. दरम्यान, कदम याचा गुन्हेगारीशी संबंध असल्याची माहिती महिलेला मिळाली होती. त्यानंतर कदमच्या खात्यात महिलेने २२ लाख दोन हजार रुपये वेळोवेळी पाठविले. मात्र, त्याने पनीर, दूध पुरवठा केला नाही. महिलेने बाहेरून पनीर, दूध खरेदी करुन शाळेला पुरविले.जानेवारी २०२५ मध्ये महिलेने कदमची भेट घेतली. तेव्हा मी नीलेश घायवळ टोळीसाठी काम करत असून, घायवळचा भाऊ सचिन हा क्रीडा शिक्षक आहे. शाळेसाठी आमच्याकडून दूध, पनीर खरेदी करावे लागेल. अन्यथा तुमचा व्यवसाय बंद पाडू’ अशी धमकी कदमने दिली. त्यानंतर महिला मोटारीतून निघाली असता कदमने मोटार अडविली. त्यावेळी दुसऱ्या मोटारीतून नीलेश घायवळ, त्याचा भाऊ सचिन आणि साथीदार उतरले. घायवळचा भाऊ सचिन याने धमकावले. तुन्हाला जिवंत राहायचे नाही का ?, अशी धमकी देऊन लवकर खात्यात पैसे जमा करा, असे सांगितले. त्यानंतर महिलेने घाबरून पुन्हा २२ लाख बँक खात्यात जमा केले. व्यवसाय बंद होऊ नये म्हणून मी आरोपींना पैसे दिले. याबाबत महिलेने कंपनीतील भागीदारांशी चर्चा केली. चौकशीत कदम याची कोथरूडमध्ये डेअरी नसल्याची माहिती समजली. त्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे पोलीस याचा तपास करत आहेत.