Pune Crime: दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्यास अटक; टेरर फंडिंगचा संशय

पुणे – पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांना राहण्यासाठी जागा देणाऱ्या कोंढवा येथील एकास दहशतवादी पथकाने अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. कचरे यांच्या न्यायालायने हा आदेश दिला.
अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय- 32, रा, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कोथरूड पोलिसांच्या पथकाने मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय-२३), मोहम्मद युसूफ मोहम्मद याकूब साकी (वय-२४, दोघेही रा. चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा. मूळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) यांना दुचाकी चोरीच्या संशयातून पकडण्यात आले होते. यांची घराची झडती घेतल्यानंतर त्यांचे दहशतवादी कनेक्शन पुढे आले होते.
मोहम्मद खान आणि मोहम्मद साकी हे जयपूर बॉम्ब ब्लास्ट मधील फरार आरोपी आहे. यांच्यावर एनआयने गुन्हा दाखल केल्यानंतर हे दोघे मार्च २०२२ मध्ये मुंबईतील भेंडी बाजार येथे पळून आले होते. मुंबईत पकडल्या जाऊ या भीतीने हे दोन्ही दहशतवादी पुण्यात आले होते. ते पुण्यातील कौसर भाग येथील एका मशीद मध्ये राहू लागले. तेव्हा त्यांची ओळख अब्दुल कादीर दस्तगीर पठाण यांच्याशी झाली. त्यावेळी या दोन्ही दहशतवाद्यांनी अब्दूल आम्ही गरीब असून कामाच्या शोधात आलो असल्याचे सांगितले.
अब्दुल कादीर दस्तगीर पठाण हा कोंढवा भागात राहत असून त्याच्या ग्राफिक्स डिझाईनचा व्यवसाय आहे. अब्दुल पठानने मोहम्मद खान आणि मोहम्मद साकी यांना ग्राफिक्स डिझाईनचे काम देतो असे सांगितले आणि त्यांना महिन्याला आठ हजार रुपये पगार दिला. तसेच अब्दुल पठाण याने चेतना गार्डन मधील अन्वर अली इद्रिस यांच्या मालकीची एक खोली भाड्याने घेतली आणि ही खोली दहशतवाद्यांना राहायला दिली. या खोलीचे ३ हजार ५०० रुपये भाडे अब्दुल या दोघांकडून घेत असे.





