Pune Crime : अल्पवयीन ‘भाईं’ची दहशत! भरवस्तीत पिस्तुलातून गोळीबार; पोलिसांकडून चौघांना बेड्या
Pune Crime : गुलटेकडी परिसरात दुचाकीवरून येऊन पिस्तुलाचा धाक; हप्ता वसुलीसाठी नागरिकांना शिवीगाळ करत हवेत गोळीबार.

Pune Crime – गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहतीत अल्पवयीनांनी दहशत माजविल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. अल्पवयीनांनी देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चौघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले. याबाबत एकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहत परिसरात शुक्रवारी (२० फेब्रु) रात्री पावणेअकराच्या सुमारास चौघे अल्पवयीन दुचाकीवरून आले. ‘आम्ही या भागातील भाई आहोत, येथे आमचीच चालणार. या भागात राहायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल’, असे सांगून अल्पवयीनांनी त्यांच्याकडील पिस्तूल दाखवत दहशत माजविली. तसेच, नागरिकांना शिवीगाळ करीत पिस्तुलातून हवेत गोळीबार केला.
या घटनेनंतर अल्पवयीन दुचाकीवरून पसार झाले. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरातील नागरिक भयभीत झाले. त्यांनी या घटनेची माहिती त्वरित पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने तपास सुरू केला. पसार झालेल्या चौघा अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील पुढील तपास करीत आहेत.
या चारही अल्पवयीन मुलांवर वर्षभरापूर्वी सिंहगड पोलीस ठाण्यात एका तरुणाच्या खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यांनी तरुणाला बोलावून घेऊन गोळीबार आणि शस्त्राने वार करीत खून केला होता. अल्पवयीन असल्याने काही दिवस त्यांना रिमांड होममध्ये ठेवण्यात आले होते.




