Pune Crime – शहरात मसाज सेंटरच्या आडून वेश्या व्यवसायाचे जाळे उभारणाऱ्या कथित मुख्य सूत्रधारावर अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. धनराज शामराव जाधव या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.पुणे शहरात स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचे रॅकेट चालविणाऱ्या दलालांविरोधात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर भूमिका घेतली असून, त्याच पार्श्वभूमीवर धनराज जाधव याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार धनराजवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार पुणे शहर, छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. धनराज हा शहरातील विविध मसाज सेंटरच्या आडून तरुणींना आर्थिक प्रलोभने देत त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचा आरोप आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी गुन्हे दाखल होऊनही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक होते असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केले. त्याच्यावर १४ जानेवारी २०२५ रोजी त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याची चाहूल लागताच तो फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून वानवडी येथून दि. ७ रोजी त्याला ताब्यात घेतले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार त्यानंतर त्याची रवानगी थेट नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. पुण्यासह संभाजीनगर, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई या शहरांत त्याचे जाळे पसरलेले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याच्या स्पा सेंटरवर यापूर्वी अनेकदा कारवाया झाल्या होत्या. तरीही तो शहराबाहेरून हे रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले. वानवडी पोलिस ठाण्यात त्याच्या स्पा सेंटरमधील कथित देहविक्रीप्रकरणी २०२४ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला होता. स्पा माफियांना थेट इशारा स्पा आणि मसाज सेंटरच्या आडून सुरू असलेल्या गैरप्रकारांबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुरुवातीपासूनच कडक धोरण अवलंबले आहे. स्थानिक पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अशा प्रकरणांवर सतत कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भूमिकेमुळे अनेक स्पा व्यावसायिकांनी शहरातून व्यवसायाचा गाशा गुंडाळला आहे. धनराज जाधववरील स्थानबद्धतेची कारवाई ही त्याच मालिकेतील मोठी कारवाई मानली जात आहे. “मसाज सेंटरच्या आडून सुरू असलेल्या गैरप्रकारांबाबत आमची सुरुवातीपासून स्पष्ट भूमिका आहे. अशा प्रकरणांतील संबंधितांवर स्थानबद्धतेसारखी कठोर कारवाई करून त्यांना थेट कारागृहात पाठवले जाईल.” – अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर