Pune Crime | दरोडेखोरांचा थरकाप ; झोपेत असलेल्या आजीवर हल्ला, घर लुटून फरार

प्रभात वृत्तसेवा
मांडवगण फराटा – इनामगाव (ता. शिरूर) येथील दर्यापट वस्तीवर शुक्रवारी (दि. २२) पहाटे दरोडा पडला. यात दरोडेखोरांनी जेष्ठ महिलेला धारदार शस्त्राने मारहाण करून गंभीर जखमी केले.इनामगाव येथील दर्यापटवस्तीवर अनिल विठ्ठल घुमरे हे रहात असून जेवणानंतर कुटुंबातील सदस्य हे वेगवेगळ्या खोल्यामध्ये झोपले होते.
शांताबाई विठ्ठल घुमरे (वय ९०) यांच्या खोलीचे दार उचकटून दरोडेखोर खोलीत घुसले असता शांताबाई आवाजाने जाग्या झाल्या तर त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. त्यांनी आराडाओरड केली असता घरातील लोखंडी पेटी उचलून सोने व रोख रक्कम घेऊन पसार झाले.
जाताना घरांना बाहेरून कड्या लावल्याने जखमी शांताबाई यांना उपचारासाठी उशीर झाला. दर्यापट भागात कार्यक्रम असल्याने इतर ठिकाणीही चोरीचा प्रयत्न झाला. शांताबाई यांच्यावर मांडवगणं फराटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून शिरूरच्या पूर्व भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून गावोगावी दक्षता पथके स्थापन करून गस्त घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम, तानाजी बाबर, अशोक शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक रमेश कदम करीत आहेत.





