पुणे – धायरी येथील सराफ दुकानात खेळण्यातील पिस्तूलाचा धाक दाखवून दरोडा टाकण्यात आला. येथून तब्बल २५ ते ३० तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरुन नेण्यात आले. त्याची अंदाजे किंमत ३५ लाख रुपये आहे. याप्रकरणी नोंदड सिटी पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेची पथके तपासासाठी रवाना झाली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, विष्णू सखाराम दहिवाल यांचे धायरीतील रायकर मळा येथील काळुबाई चौकात श्री सराफ नावाची सराफी पेढी आहे. दुपारी पावणे तीनच्या सुमारास ते कामगारासह उपस्थित होते. तेव्हा एक व्यक्ती सोन्याची चेन दाखवा म्हणून दुकानात आली. त्याच्या पाठोपाठ आणखी दोन व्यक्ती दुकानात घुसले. त्यांनी हातातील पिस्तूल दाखवून धमकी देत सोन्याचे ३० तोळे वजनाचे दागिने जबरदस्तीने चोरले. दुकान मालकाने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, त्याला हाताने आणि पिस्तूलच्या दांड्याने मारहाण करण्यात आली. यानंतर तीघेही आरोपी दुचाकीवरुन पळून गेले. दुकानमालकाने तातडीने पोलिसांना खबर दिली. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा त्यांना पिस्तूलचा दांडा मिळाला. त्यावरुन हे पिस्तूल खेळण्यातले असल्याचे निष्पन्न झाले. परिसरातील सीसीटीव्ही आरोपी दुचाकीवरुन जाताना दिसून येत आहेत. मागे बसलेल्या व्यक्तीच्या पाठिवर एक सॅकही दिसत आहे. तीन्ही आरोपींचे वय २५ ते ३५ दरम्यान होते. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.