Pune Crime: 100 कोटींच्या डीलसाठी गेले ते परतलेच नाही; पुण्यातील उद्योजकाची बिहारमध्ये हत्या

पुणे – शहरातील कोथरूड परिसरात राहणार्या एका मराठी उद्योजकाची बिहारमध्ये हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित व्यावसायिक पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओइपी)चे माजी विद्यार्थी होते. लक्ष्मण साधू शिंदे ( वय ५५, रा. डीपी रस्ता, कोथरूड) असे हत्या झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. ते रत्नदीप कास्टिंगचे संस्थापक म्हणून कार्यरत होते.
तब्बल १०० कोटी रुपयांच्या ऑर्डरसंदर्भात चर्चा करण्यासाठी ते बिहारला गेल्यापासून ते बेपत्ता झाले होते. अखेर त्यांचा मृतदेह आढळून आला असून, आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी खूनाचे नेमके कारण पोलिसांकडून शोधले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी काही दिवसांपुर्वी उद्योजक लक्ष्मण शिंदे यांना झारखंडमधील खाण उपकरणांशी संबंधित सुमारे १०० कोटी रुपयांची ऑनलाईन ऑर्डर दिली होती. त्यानंतर चर्चेसाठी त्यांना बिहारमधील पटना येथे आमंत्रित केले होते. त्यानुसार ११ मार्चला शिंदे हे विमानाने पटना येथे पोहोचल्यानंतर, त्यांनी संबंधित व्यक्तींसोबत चर्चा केली.
त्यारात्री त्यांची कुटूंबियासोबत बोलणे झाले होते. मी झारखंडला चाललो आहे, त्याठिकाणी खाणकाम प्लँटमध्ये मशीनरीचे काम पाहण्यासाठी जाणार आहे. त्यानंतर त्यांचा कुटूंबियासह इतरांसोबत कोणाशीही संपर्क झाला नाही. तसेच त्यांच्या फोनवरून पाठवलेले सर्व मेसेज डिलीट केले. आरोपींने त्यांचे अपहरण करुन दूरच्या ठिकाणी नेले. त्यांच्या बँकखात्यातून रक्कम वर्ग करुन घेत त्यांची हत्या केल्याची माहिती पटना पोलिसांनी दिली आहे.





