प्रभात वृत्तसेवा पुणे – मसाज पार्लर म्हटले की थकवा दूर करणारी सेवा, प्रसन्न आरामदायी वातावरण, व्यावसायिक फिजिओथेरपिस्ट, असे एक साधारणचित्र नजरेसमारे येते. अलिकडच्या काळात मात्र हे चित्र धुसर झाल्याचे पुणेकरांच्या नजरेस येत असून मसाज पार्लरची एक वेगळीच प्रतिमा तयार होत आहे. शहरभर उभारलेल्या मसाज पार्लरच्या फलकांमागे प्रत्यक्षात काय सुरू आहे हे अनेकदा छाप्यांनंतरच उघडकीस येते.चंदननगर पोलिसांना अशीच एक गुप्त माहिती मिळाली. खराडीतील एका फिटनेस क्लबजवळ मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खबर मिळताच, त्यांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. संशय बरोबर ठरला. छापा पडताच धावपळ उडाली. काही तरुणी ताब्यात घेतल्या. चौकशीत समोर आले की, त्यांना जादा पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकलले जात होते. पोलिसांनी या प्रकरणी संदीप चव्हाण, रोहित शिंदे, गोपाळ आणि स्वाती उर्फ श्वेता विजय शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पुन्हा डोके वर.. बाणेर, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, विमाननगर या भागांत काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात असे अड्डे उघडपणे चालत. पोलिसांच्या सततच्या कारवाईमुळे त्याला आळा बसला होता. आता हे जाळे उपनगरांत हातपाय पसरू लागले आहे. नागरिकांच्या नजरेस सहज येईल अशा मुख्य रस्त्यावरच मसाज पार्लरचे बोर्ड लावून उघडउघड वेश्याव्यवसाय सुरू आहे. यानंतरही प्रश्न असा मनात येतो की, सामान्य नागरिकांना हे सर्व दिसते, मग पोलिसांना हे कसे दिसत नाही? याकडे डोळेझाक होते की आर्थिक हितसंबंध सांभाळत अभय, दिले जाते असा प्रश्न निर्माण होतो. या पार्लरना प्रत्यक्षात कोणत्याही वैद्यकीय किंवा फिजिओथेरपी सेवांची परवानगी नसते. फक्त शॉप ॲक्टचा परवाना घेऊन धंदा सुरू करता येतो. याचा गैरफायदा घेत अनेकांनी पार्लर उभारले आहेत. कायदेशीर जाळ्यात अडकण्याचा धोका कमी, आणि नफा प्रचंड, त्यामुळे हा व्यवसाय वाढीस लागला आहे. परदेशी तरुणींचाही सहभाग.. मध्यंतरीच्या छाप्यांत परदेशी तरुणीही सापडल्या होत्या. त्यामुळे हे जाळे केवळ स्थानिकच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही जोडलेले असल्याचे स्पष्ट होते. मागील चार दिवसांत पोलिसांनी तीन मसाज पार्लरवर कारवाई केली आहे. परंतु, कारवाईनंतर काही दिवस शांतता आणि पुन्हा ततोच प्रकार असे चक्र सुरू राहते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचे आदेश दिले असले तरी नागरिकांची ही अपेक्षा आहे की, आता कारवाई केवळ आकडेवारीपुरती मर्यादित न राहता कायमस्वरूपी असले छुपे वेश्या व्यवसाय मोडीत काढणारी असावी.