Pune Crime | पोलिसच अंमली पदार्थांच्या रॅकेटचा भागदार!

प्रभात वृत्तसेवा
पुणे – अंमली पदार्थांचा वापर पुणे परिसरात दिवसेंदिवस वाढत असताना अंमली पदार्थांच्या व्यवसायात एका पोलिसाचाच सहभाग असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी नवनाथ शिंदे याला निलंबित केले असून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकत्याच झालेल्या कारवाईत ५ किलो गांजा जप्त केला होता. याचा तपास करताना शिंदे हा व्यवसायास संरक्षण देण्याबरोबर प्रत्यक्ष भागीदार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या नंतर आयुक्तांनी हस्तक्षेप करत एनडीपीएस कायद्यांतर्गत शिंदेविरोधात थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. शिंदेचे वर्तन पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे असल्याचे सांगत त्याला निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त मिलिंद माेहिते यांनी दिले.
असे उलगडले धागेदोरे..
गुन्हे शखा युनिट ५ चे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या पथकाला गस्तीवेळी पद्मावतीमध्ये प्रतीक पवार याच्याकडे गांजा असल्याची माहिती मिळाली. सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे पाच किलो २६० ग्रॅम गांजा मिळाला. चौकशीत सौरभ कट्टीमणी ऊर्फ पाटील, सागर चव्हाण ऊर्फ डागाभाई, अभिजित सावंत यांनी पवार, संदीप घोटे ऊर्फ सॅण्डीला विक्रीसाठी गांजा पुरविल्याचे निष्पन्न झाले.
चौकशीत नवनाथ शिंदे हा कट्टीमणीकडून दरमहा पैसे घेत असून, अवैध धंद्यांना मदत करीत असल्याचे समोर आले. पवारच्या मोबाईलमध्येही शिंदेचा संपर्क क्रमांक मिळाला. यानंतर वरिष्ठांनी चौकशी करून शिंदेवर थेट कारवाई केली.
याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, गुन्हेगारीत कोणताही पोलीस सहभागी असल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई होईल. पोलील वर्दीतील गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही.”नवनाथ शिंदेविरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात येणार असून याप्रकरणात आणखी कोणी अधिकारी, स्थानिक व्यक्ती सामील आहेत का, याचाही तपास सुरू आहे.
त्या छाप्याची चौकशी..
या अवैद्य व्यवहाराची खबर मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या पथकाला छापा टाकण्यास सांगितेल होते. तेव्हा तेथे काहीही नसल्याचे सांगत गुन्हा दाखल केला नव्हता. ही बाब संशयास्पद वाटल्याने वरिष्ठांनी गुन्हे शाखा युनिट ५ ला छापा टाकण्यास सांगीतले. त्यावेळी गांजा सापडला होता. यामुळे पहिल्या पथकाच्या छाप्याची आता चौकशी हणार आहे.





