Pune Crime : कोंढव्यात अल्पवयीनांची दहशत; किरकोळ वादातून मध्यरात्री रिक्षा, कारच्या फोडल्या काचा

पुणे – किरकोळ वादाच्या रागातून कोंढव्यातील मिठानगर भागात अल्पवयीन मुलांनी मध्यरात्री दहशत माजविली. ३ रिक्षा आणि २ कारच्या काचा फोडून परिसरात धुमाकूळ घातला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चौघांपैकी तिघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.
अतिक अहमद शेख (वय ४८, रा. मिठानगर, कोंढवा) यांनी याबाबत कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. शेख यांनी त्यांची रिक्षा घराबाहेर पार्क करून झोप घेतली होती. शनिवारी मध्यरात्री साधारण दीड वाजण्याच्या सुमारास ३ ते ४ जण दुचाकीवरून आले. तोंडाला मास्क लावलेले हे तरुण आरडाओरडा करत गल्लीत शिरले आणि धारदार हत्याराने त्यांच्या रिक्षेची काच फोडली.
आवाजाने शेख जागे झाले आणि खाली येऊन पाहिले असता त्यांच्या रिक्षेची काच फुटलेली व फ्रेम वाकलेली होती. त्याचवेळी मिर्झा समी हे कार घेऊन जात असताना त्यांच्या मारुती कारच्या दोन्ही बाजूच्या दरवाजाच्या तसेच पुढील व मागील काचा या हल्लेखोरांनी फोडल्या. सुदैवाने समी गाडीत खाली वाकल्याने त्यांना इजा झाली नाही. याशिवाय आणखी दोन रिक्षा आणि एका कारच्या काचा फोडल्या असल्याचे पोलिस तपासात समोर आले.
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी सांगितले की, “मिठानगर भागात वाहनांच्या काचा फोडणारे चौघे आढळून आले असून त्यातील तिघे अल्पवयीन आहेत. आपापसातील किरकोळ वादाचा राग त्यांनी इतरांच्या वाहनांवर काढला. चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे.”





