Pune Crime: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीला अटक

पुणे – सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कविता अतुल साळवे (वय.21,रा. गल्ली क्रमांक 82, जनता वसहात) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी, वडील प्रकाश त्रिंबक तायडे (वय.60,रा. चांगेफळ, बुलढाना) यांनी दत्तावाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अतुल गोरख साळवे (वय.31,रा. जनता वसाहत) याला पोलिसांनी अटक केली असून, विवाहितेची सासू व दिर अशा तिघांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2019 ते 2 फेब्रुवारी या कालावधीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी कविता व आरोपी पती अतुल या दोघांचा 2019 मध्ये विवाह झाला होता. तेव्हापासून कविता ही सासरी नांदत असताना, अतुल हा कविता हिला तुझ्यासोबत माझे लग्न झाल्यापासून वाटोळे झाले आहे. तुझ्यापासून मला काहीच फायदा नाही, तुला स्वयंपाक निट करता येत नाही, तुझे आई-वडील जादूटोना करतात त्यामुळे मला यश येत नाही असे म्हणून वारंवार टोचून बोलत होता.
तर सासू व दिर हे दोघे देखील आप-आपसात संगनमत करून कविता हिचा छळ करत होते. त्यामुळे सतत होणार्या शारिरीक व मानसिक छळास कंटाळून कविता हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरूवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. कविता हिच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पती अतुल साळवे याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद खरात करीत आहेत.





