प्रभात वृत्तसेवा पुणे – कोथरूडमध्ये तरुणावर गोळीबार केल्यानंतर परदेशात पळून केलेला कुख्यात गुंड निलेश घायवळला अटक करायची असून, त्यासाठी त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी पुणे पोलिसांनी विशेष ‘मकोका’ न्यायालयाकडे केली. दरम्यान, याप्रकरणी अटकेतील पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.या प्रकरणात मयूर उर्फ राकेश गुलाब कुंबरे (वय २९), मयंक ऊर्फ माँटी विजय व्यास (वय २९), आनंद अनिल चांदलेकर (वय २४, तिघे रा. शास्त्रीनगर, कोथरूड), गणेश सतीश राऊत (वय ३२) आणि दिनेश राम फाटक (वय २८, दोघे रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरूड) यांना अटक झाली आहे. त्यांच्यासह निलेश बन्सीलाल घायवळ (वय ४९, रा. शास्त्रीनगर, कोथरूड), मुसाब इलाही शेख (वय ३३, रा. सिद्धीविनायक कॉलनी, कोथरूड), अक्षय दिलीप गोगावले (वय २९, रा. बोराटे चाळ, कोथरूड), जयेश कृष्णा वाघ (वय ३५, रा. केळेवाडी, कोथरूड) आणि रोहित विठ्ठल आखाडे (वय २९, रा. गुरुजन सोसायटी, कोथरूड) यांच्याविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत, प्रकाश मधुकर धुमाळ (वय ३६, रा. वाकड) यांनी कोथरूड पोलिसात तक्रार दिली आहे. ही घटना १७ सप्टेंबर रोजी रात्री पावणेबाराला कोथरूडमधील मुठेश्वर चौकात घडली होती.तक्रारदार मित्रांसमवेत गप्पा मारत असताना, घायवळ टोळीतील गुंड दुचाकीवरून जात होते. त्यांना जाण्यासाठी रस्ता न दिल्याच्या किरकोळ कारणांवरून भांडणे झाली. त्यातून आरोपींनी धुमाळ यांना मारहाण केली. त्यापैकी एकाने त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर आरोपींनी सागर कॉलनी परिसरात वैभव साठे याच्यावर कोयत्याने वार केले. आम्ही या भागाचे भाई आहोत, असे म्हणून आरोपींनी दहशत माजवली, असे तक्रारीत नमूद आहे. टोळीप्रमुख निलेश घायवळ फरार असून, तो परदेशात पळून गेला आहे. त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस काढली आहे. त्याच्या अटकेसाठी पासपोर्ट रद्द करण्याचा न्यायालयाने आदेश द्यावा, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. आरोपींतर्फे ॲड. विपुल दुशिंग, ॲड. मयूर दोडके यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली; तसेच पासपोर्ट रद्द करण्याबाबत कायद्यातील तरतुदींची माहिती देण्याचे आदेश सरकार पक्षाला दिले.