Pune Crime: वैद्यकीय निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; सव्वा वर्षानंतर डॉक्टर, नर्सवर गुन्हा

पुणे – डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना भागात घडली होती. मृत्यूनंतर सव्वा वर्षानंतर वैद्यकीय चौकशी समितीचा अहवाल आल्यावर दोन डॉक्टर आणि एका परिचारिकेवर खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. खालीद सय्यद (वय 50, रा. बोपोडी) याच्यासह आणखी एका महिला डॉक्टर आणि परिचारिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल तुपसौंदर्य (वय 26, रा. खडकी बाजार) याच्या मृत्यू प्रकरणी पत्नी कविता यांनी फिर्याद दिली आहे. फिर्याद नोंदविण्यासाठी ऍड. योगेश आहेर आणि ऍड. अमोल रायकर यांनी मदत केली.
ही घटना सप्टेंबर 2021 मध्ये घडली होती. अंगात कणकण आल्याने अतुल 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी डॉ. सय्यद यांच्या रुग्णालयात उपचारासाठी गेला. त्यावेळी डॉक्टरांच्या सुचनेनुसार परिचारिकेने कमेरेवर उजव्या बाजूला इंजेक्शन दिले. त्या जागी इंफेक्शन होऊन गाठ झाली. त्यानंतर ससून रुग्णालय येथे 24 सप्टेंबर रोजी अतुलचा मृत्यू झाला होता. ससून रुग्णालयाच्या अधिठाताच्या अध्यक्षतेखाली नेमेलेल्या समितीच्या अहवालनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“वैद्यकीय चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर खडकी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. फिर्यादी महिलेला न्याय मिळवून दिल्याचा आनंद वाटत आहे.”
– ऍड. योगेश आहेर आणि अमोल रायकर





