प्रभात वृत्तसेवा पुणे – एका सराईत गुन्हेगाराला अटक करीत असताना रक्तदाब वाढल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना कोंढवा येथे शुक्रवारी संध्याकाळी घडली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.अझीम अबू सलीम खान (५१, रा.मीरा -भाईंदर) असे मृत्यू झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर अंमली पदार्थ विक्री प्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. एका मेफेड्रोन प्रकरणात मीरा-भाईंदर पोलीस त्याचा शोध घेत होते त्यानुसार पोलिसांनी रत्नागिरी, कोल्हापूरमार्गे पुण्यात धाव घेतली होती. तीन दिवसांपूर्वीच खान कोल्हापूरहून पुण्यात येऊन कौसरबागमधील एका तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेमध्ये रहात असल्याची माहिती मिळाली. पोलीस तेथे गेल्यावर सदनिकेचे दार आतून बंद होते. पोलिसांनी बराच वेळ दार ठोठावले, पण प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी खान पोलिसांवर झेपावला आणि एका कॉन्स्टेबलच्या छातीत चावा घेतला. त्यावेळी पोलिसांनी त्याला दूर ढकलले. यावेळी झालेल्या गोंधळात खान अचानक बेशुद्ध पडला आणि जमिनीवर कोसळला.कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुमार घाडगे यांनी सांगितले की, त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे मृत घोषीत केले गेले. ही सदनिका त्याच्या मैत्रिणीची असल्याचे प्राथमिक तपासात समजत आहे.