Pune Crime : आयुष कोमकर खूनप्रकरणातील बंडू आंदेकरच्या बेकायदा बांधकामांवर बुलडोझर

प्रभात वृत्तसेवा
पुणे : आयुष कोमकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरने उभारलेली आठ पक्की शौचालये, पत्राशेड व इतर बेकायदा बांधकामे अखेर पोलिसांनी पालिकेच्या मदतीने जमीनदोस्त केली. कडक बंदोबस्तात झालेल्या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.ही बांधकामे जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली. कारवाईदरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
आंदेकरविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) तसेच इतर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारांच्या आर्थिक मुळांवर घाव घालण्याचा भाग म्हणून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे.आंदेकर टोळीच्या दहशतीमुळे नागरिक वर्षानुवर्षे दडपणाखाली राहत होते. शेवटी प्रशासनाने ठोस पाऊल उचलणे आम्हाला धीर देणारे असल्याची प्रतिक्रिया परिसरातील एका रहिवाशाने दिली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, परिमंडळ एकचे उपायुक्त कृषीकेश रावले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्त यांच्या उपस्थितीत पार पडली.





