पुणे गुन्हे शाखेची नाशिकमध्ये मोठी कारवाई; ५० हून अधिक गुन्ह्यांचा आरोपी अटकेत

पुणे : पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने नाशिक येथे सापळा रचून तब्बल ५० हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस अटक केली आहे. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासातून ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी कोरेगाव पार्क येथील पृथ्वी एक्सचेंज इंडिया लि. येथे घरफोडीची घटना घडली होती. या प्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्याच्या तपासात अंगुलीमुद्रा विभागाने आरोपीचे ठसे मिळवले. तपासातून आरोपी रामनिवास मंजू गुप्ता (वय ३७, रा. महू, मध्यप्रदेश / विठ्ठलवाडी, ठाणे) याचे नाव समोर आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजूम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ आणि त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. यावेळी रसाळ यांना खबर मिळाली की आरोपी नाशिक येथे येणार आहे. त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनच्या मदतीने सापळा लावून आरोपी रामनिवास गुप्ता यास ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक चौकशीत आरोपीने पुणे शहरातील कोरेगाव पार्क व येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, उप-आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजूम बागवान, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार ओम कुंभार, आबनावे, नेवसे, शिंदे, भिलारे, चव्हाण, सरडे, ताम्हाणे, जाधव, मोकाशी, पवार, टकले, निखील जाधव, संजय आबनावे व विनायक वगारे यांच्या पथकाने केली.





