Pune Crime : पोलिसांची मोठी कारवाई! गजा मारणेचा उजवा हात रुपेश मारणे याला ९ महिन्यांनी बेड्या

प्रभात वृत्तसेवा
पुणे – कोथरूड भागात एका संगणक अभियंता तरुणाला मारहाण प्रकरणात फरार झालेला गुंड आणि गजानन मारणे याचा जवळचा साथीदार रुपेश मारणे याला मुळशीतील आंदगावातून मंगळवारी पहाटे अटक करण्यात आली. संगणक अभियंता प्रकरणात मारणे हा मागील नऊ महिने पोलिसांना गुंगारा देत होता.मारणे याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका व्यावसायिकाचे अपहरण करून चार कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी तीन वषार्पूर्वी गजा मारणे, रूपेश मारणे यांंच्यासह १५ जणांविरुद्ध मकोका कारवाई करण्यात आली होती.
त्यावेळीही रूपेश मारणे फरार झाला होता. तेव्हाही त्याला मुळशी तालुक्यातून अटक करण्यात आली होती.संगणक अभियंता तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गुंड गजा मारणे व त्याच्या साथीदारांविरुद्ध १७ फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्या प्रकरणामध्ये रूपेश मारणे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली. त्या गुन्ह्यात मारणे याचा साथीदार गुंड रूपेश कृष्णराव मारणे (४०, रा. शास्त्रीनगर, पौड रस्ता, कोथरूड) हा फरार झाला होता.
त्याच्या शोधासाठी पोलिसांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात पथके पाठवली होती. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. रूपेश मारणे गेले नऊ महिने पोलिसांना गुंगारा देत होता.दरम्यान, मारणे हा मुळशीतील आंदगाव परिसरात एका बंगल्यात राहत असल्याची माहिती कोथरूड पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने पहाटे बंगल्याला वेढा घालत रूपेश मारणे याला ताब्यात घेत अटक केली.
संगणक अभियंत्याची केसमधून माघार?
श्री शिवजयंतीच्या दिवशी १९ फेब्रुवारी रोजी कोथरूड परिसरातून मिरवणूक निघाली होती. त्यावेळी गजा मारणे आणि साथीदार मोटारीतून चित्रपट पाहण्यासाठी निघाले होते. त्या मिरवणुकीत भेलकेनगर चौकात मारणे टोळीतील गुंडांनी किरकोळ वादातून संगणक अभियंता तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
तसेच, गुंड गजा मारणेने साथीदारांना चिथावणी दिल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने मारणे टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली होती. त्यानंतर ३ मार्च रोजी ‘मारहाण प्रकरणात कोणी चिथावणी दिली नाही’, असे प्रतिज्ञापत्र तक्रारदार संगणक अभियंत्याने विशेष न्यायालयात सादर केले.
रुपेश मारणे हा सासूरवाडीला राहत होता. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो दिवसभर जंगलात राहत असे, तर रात्री उशिरा अंधार झाल्यावर घरी परतत होता. दरम्यान, पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने त्याला अटक केली. दरम्यान, कोर्टाने मारणेला तीन दिवस पोलीस कोठडी झाली असून सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. प्रमोद बोंबटकर यांनी कामकाज पाहिले.





