Pune Crime : आंदेकर टोळीतील आणखी एक गुंड गजाआड ; ‘मकोका’ कारवाईनंतर फरार सराईताला पकडण्यात यश

प्रभात वृत्तसेवा
पुणे – माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीतील सराईतांच्या नातेवाईकांच्या घरावर पाळत ठेवणाऱ्या आंदेकर टोळीतील सराईताला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. आंदेकर टोळीतील सराईताविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर तो पसार झाला होता. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.दत्ता बाळू काळे (२४, रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
१ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा खुनाचा बदला घेण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीतील सोमनाथ गायकवाड आणि साथीदारांच्या घर परिसरात सराईत दत्ता काळेने पाळत ठेवली होती. प्रतिस्पर्धी टोळीतील सराईत आणि त्यांच्या नातेवाईकांच्या खुनाचा कट आंदेकर टोळीने रचला होता. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आंदेकर टोळीतील सराईतांना अटक करण्यात आली होती. परंतु, गुन्हा दाखल झाल्यानंतर काळे पसार झाला होता. भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते.
काळे लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाच्या परिसरातील उड्डाणपुलाजवळ थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी महेश बारावकर, मंगेश पवार यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून काळेला पकडण्यात आले. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, महेश बारावकर, मंगेश पवार, नीलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी यांनी ही कारवाई केली.
वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी घडली होती. त्यानंतर बंडू आंदेकरने आयुषच्या खुनाचा कट रचला होता. आयुष हा बंडू आंदेकरचा नातू म्हणजेच मुलीचा मुलगा आहे. आयुष कोमकर खून प्रकरणात सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (७०) याच्यासह साथीदारांविरुद्ध ‘मकोका’ करवाई करण्यात आली होती. नुकतेच एका जमीन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी बंडू आंदेकरसह बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.





