Pune Crime – पहाटेच्या भयाण शांततेत अचानक कुत्र्यांच्या भुंकण्याने जीवाच्या आकांताने दोघे मित्र पळू लागले. त्याचवेळी चोर असल्याच्या संशयातून या तरुणांचा टोळक्याने पाठलाग केला. दुर्दैवाने पळताना १९ वर्षीय तरुणाचा पाय घसल्याने तो टोळक्याच्या तावडीत सापडला. टोळक्याने बॅट आणि लाथा-बुक्क्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वानवडी परिसरात बुधवारी (दि. १८) पहाटे घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. रुपेश धनराज शिंदे (वय १९, रा. मोशी, पिंपरी- चिंचवड) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील धनराज बळीराम शिंदे (वय ४५) यांनी वानवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश शिंदे आणि त्याचा मित्र अजय गणेश टिंगरे (वय २०) हे दोघे बुधवारी (दि. १८) पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास दुचाकीवरून मोशीच्या दिशेने जात होते. हडपसर येथील शंकरमठ परिसरातून जाताना ते लघुशंकेसाठी पवार एन्क्लेव्ह सोसायटीसमोरील कॅनाललगतच्या मोकळ्या जागेत गेले. त्या ठिकाणी कबुतरे ठेवण्याचे बॉक्स होते. त्या वेळी अचानक कुत्र्यांनी जोरात भुंकायला सुरुवात केली. त्यामुळे चोर असल्याच्या संशयाने रहिवाशांनी त्यांचा पाठलाग केला. दुसरीकडे भीतीपोटी रुपेश आणि अजय तिथून सैरावैरा पळू लागले. पळताना मुख्य रस्त्यावर रुपेश पाय घसरून खाली पडला. त्या वेळी पाठलाग करणाऱ्या पाच जणांनी त्याला क्रिकेटच्या बॅटने डोक्यात व अंगावर बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रुपेशला तत्काळ जवळील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, वानवडी पोलीस तपास करीत आहेत. कबुतर चोरीचा संशय? आरोपींनी नेमक्या कोणत्या रागातून ही टोकाची मारहाण केली, याचा उलगडा पोलीस करत आहेत. कबुतर चोरण्याच्या संशयातून ही घटना घडली का, या दिशेने देखील पोलीस तपास करत आहेत.