Pune Crime : पोलिसानेच चोरले १० कोटींचे ड्रग्ज; शिरूरमधील ‘त्या’ गॅरेजचालकाने उघडलं गुपित..वाचा सविस्तर
पुणे ग्रामीण पोलिसांनी शिरूरमध्ये गॅरेजचालकाकडून जप्त केलेल्या अंमली पदार्थाच्या विक्रीत प्रत्यक्ष पोलीस कर्मचाऱ्याचा हात असल्याची बाब समोर आली आहे.

Pune Crime – पुणे ग्रामीण पोलिसांनी शिरूरमध्ये गॅरेजचालकाकडून जप्त केलेल्या अंमली पदार्थाच्या विक्रीत प्रत्यक्ष पोलीस कर्मचाऱ्याचा हात असल्याची बाब समोर आली आहे. श्रीरामपुरातील एमआयडीसीत जप्त केलेला अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ या पोलिसाने चोरून परस्पर विक्री केल्याचे दिसते.१८ जानेवारी रोजी शिरूरमधील गॅरेजचालक शादाब रियाज शेख ( ४१) याच्याकडून एक किलो ५२ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले.
फॉरेन्सिक तपासणीत हा पदार्थ झोपेच्या गोळ्या तयार करण्यासाठी वापरला जाणारा अल्प्राझोलम असल्याचे निष्पन्न झाले.चौकशीत शादाब शेखने अहिल्यानगरच्या अंमली पदार्थ विरोधी विभागातील पोलीस कर्मचारी शामसुंदर गुजरसह अन्य तिघांची नावे घेतली. तांत्रिक तपासात गुजरचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याच्यासह चार आरोपींना अटक केली.
आरोपींकडून आंतरराष्ट्रीय बाजारातील किमंतीनुसार १० कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा १० किलो ७०० ग्रॅम अल्प्राझोलम जप्त केला. मे २०२५ मध्ये श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात एका टेम्पोतून १३ कोटी ७५ लाखांचा अल्प्राझोलम जप्त केला होता. हाच मुद्देमाल गुजर याने पदाचा गैरवापर करून चोरल्याचे आता उघड झाले आहे.काही आरोपींनी हा अंमली पदार्थ घरातील गोठ्यात, तर काहींनी शेतात लपवून ठेवल्याचे उघड झाले.
पुणे ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे हा साठा हस्तगत केला. या प्रकरणी शादाब रियाज शेख (रा. शिरूर, पुणे),शामसुंदर गुजर (रा. अहिल्यानगर),ऋषिकेश प्रकाश चित्तर (रा. कुरुंद, ता. पारनेर),महेश गायकवाड (रा. श्रीगोंदा),ज्ञानदेव शिंदे (रा. अहिल्यानगर) यांना अटक केली असून, दुचाकी, कारसह इतर साहित्य जप्त केले आहे.
रक्षक बनला भक्षक
पोलीस अंमलदार शामसुंदर गुजर हा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेत मुद्देमाल कारकून म्हणून कार्यरत होता. जप्त अंमली पदार्थाची देखरेख व साठवणूक करण्याची जबाबदारी असताना त्यानेच साडेदहा किलो अल्प्राझोलम परस्पर बाहेर काढून आरोपींमार्फत विकल्याचे आढळले. अल्प्राझोलमच्या जागी त्याने मैदा भरुन ठेवला होता. चौकशीत आणखी मोठे मासे अडकण्याची शक्यता आहे.
अल्प्राझोलम म्हणजे काय?
अल्प्राझोलम हा कृत्रिम रासायनिक पदार्थ असून चिंता, पॅनिक डिसऑर्डर तसेच झोपेच्या औषधांमध्ये तो वापरला जातो. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय या औषधांची विक्री बेकायदेशीर आहे. मेंदूवरील परिणामांमुळे तात्पुरता आराम मिळत असल्याने त्याचा अंमली पदार्थ म्हणून गैरवापर वाढत असून, यामुळेच त्याची अवैध तस्करी होत असते.





