Pune Crime: ड्रग माफिया ललित पाटील पलायन प्रकरणात 2 पोलीस अधिकारी आणि 7 कर्मचारी निलंबित

पुणे – ससून रुग्णालयातून पळून गेलेल्या अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्या पलायनप्रकरणी दोन पोलीस अधिकारी आणि सात कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांचा चौकशी अहवाल मुख्यालयाच्या उपायुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. त्यांची सहायक पोलीस आयुक्तांमार्फत चौकशी केली जाणार आहे.
ललितने “प्लॅन’ आखून पलायन केल्याचे बोलले जात आहे. त्याच्या चौकशीत कारागृह, पोलीस आणि ससून प्रशासनातील अधिकाऱ्यांची नावे उघड होण्याची शक्यता होती, अशीही चर्चा आहे.
ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल असणाऱ्या रुग्णांच्या बंदोबस्तासाठी मुख्यालयाअंतर्गत असणाऱ्या कोर्ट पार्टीचे पोलीस कर्मचारी नेमले जातात. हे कर्मचारी शिफ्टप्रमाणे नेमले जातात. तेथे अमली पदार्थ सापडले तेव्हा बंदोबस्तावर एक सहायक उपनिरीक्षक आणि तीन अंमलदार होते.
याप्रकरणी या चौघांची चौकशी होणार आहे. तर, तो पळून गेलेल्या दिवशी बंदोबस्तावर एक महिला पोलीस उपनिरीक्षक आणि चार अंमलदार बंदोबस्तावर होते. तर दुसरीकडे उपायुक्तांकडून ससून प्रशासनाला वॉर्डाच्या आत सीसीटीव्ही बसवण्यासंदर्भात पत्र पाठवण्यात येणार आहे.
ससून आरोपी पलायन प्रकरणात निलंबन
1. पोउपनि मोहिनी डोंगरे
2. HC २७१९ आदेश सिताराम शिवणकर
3. PN 7636 नाथाराम भारत काळे
4. PC 10287 पिरप्पा दत्तू बनसोडे
5. PC 6939 अमित सुरेश जाधव
ससुन ड्रग प्रकरण हलगर्जीपणा निलंबीत
१ ASI 3001 रमेश जनार्दन काळे
2. PC 2801 विशाल बाबूराव टोपले
3. PC10088 स्वप्निल चिंतामण शिंदे
4. PC 12037 दिगंबर विजय चंदनशिव





