Pune Crime: मेडिकल प्रवेशाच्या नावाखाली ४० लाखांचा गंडा! तेलंगणाचा बडा ठग पोलिसांच्या जाळ्यात
Pune Crime: येरवडा पोलिसांची धडक कारवाई; सिकंदराबाद येथील अरविंद प्रकाशकुमार आरोगोंडा याला न्यायालयाच्या आदेशानंतर घेतले ताब्यात.

Pune Crime – वैद्यकीय अभ्यासक्रमास (एमबीबीएस) प्रवेश मिळवून देण्याची आमिषाने राज्यातील अनेक विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करणाऱ्या तेलंगणातील एकाला येरवडा पोलिसांनी अटक केली. आरोपीने ४० विद्यार्थ्यांची फसवणूक केली असून त्याच्याविरुद्ध हैद्राबाद, मुंबईत फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत. अरविंद प्रकाशकुमार आराेगोंडा ( ४७, रा. सिंकदराबाद, तेलंगणा) असे आरोपीचे नाव आहे.
वैद्यकीय प्रवेशासाठी अरविंदने एका पालकाची आठ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी १८ मार्च रोजी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, आरोपीला मुंबई पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याला ऑर्थर रोड कारागृहात कोठडीत ठेवले असता येरवडा परिसरात त्याने फसवणूक केल्याची माहिती तपासात मिळाली.
त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने त्याला येरवडा पोलिसंनी तपासासाठी ताब्यात घेतले. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला, सहायक आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय ठाकर यांनी ही कामगिरी केली
पुण्या मुंबईत केंद्र
आरोपी आणि साथीदाराने एडव्हिओ लर्निंग सोल्यूशन्स प्रा. लि. नावाची कंपनी हैद्राबादमध्ये सुरू केली होती. या कंपनीच्या पुणे, मुंबईत शाखा सुरू केल्या. वैद्यकीय प्रवेश मिळवून देण्याची जाहिरात त्याने समाज माध्यमात प्रसारित केली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश मार्गदर्शनासाठी पाच लाख रुपये, खासगी महाविद्यालयात प्रवेशासाठी तीन लाख रुपये असे शुल्क तो आकारत होता. वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश न मिळाल्यास पैसे परत करु, असे आश्वासनही त्याने दिले होते.





