पुणे : भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष धीरज घाटे यांना नियुक्तीपत्र देण्याच्या घरकुल लॉन्समधील कार्यक्रमाकडे नगरसेवक, शहर पदाधिकाऱ्यांंनी पाठ फिरविली. कार्यक्रमाला गर्दीच नसल्याने लॉन्समधील कार्यक्रम गुंडाळून घाटे यांंना पक्ष कार्यालयातच नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम उरकण्यात आला. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी भाजप प्रयत्नशील असला तरी पक्षातील या नाराजीची कितपत गंभीर दखल घेतली जाते यावर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. कार्यालयातच दिले नियुक्तीपत्र विधानसभा निवडणूक संपताच भाजपकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणी सुरू करण्यात आली. त्या प्रक्रियेत राज्यभरात पक्षाने अनेक ठिकाणी शहराध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष बदलले आहेत. मात्र, पुण्यात विद्यमान शहराध्यक्षांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. घाटे यांच्याबरोबर अनेकजण या पदासाठी इच्छुक होते. घाटे यांच्या नियुक्तीनंतर त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यासाठी घरकूल लाॅन्स येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार आणि पुणे जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक धनंजय महाडिक, पुणे शहराचे निवडणूक निरीक्षक शेखर इनामदार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान आणि शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या कार्यक्रमाला ५ वाजता उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला दांडी मारल्याचे पाहून अनेक जण बाहेरूनच निघून गेले. त्यामुळे मोठया प्रमाणात कार्यक्रमाचे नियोजन केले असताना गर्दी जमली नसल्याने हा कार्यक्रम पक्ष कार्यालयात घेण्यात आला. त्या ठिकाणी महाडीक यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देण्यात आले. नगरसेवकांचीही पाठ महापालिकेत भाजपचे सुमारे १०० माजी नगरसेवक आहेत. तसेच, शहरात अनेक कार्यकारिणी सदस्य आहेत. यातील अनेक पदाधिकाऱ्यांंनी केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेत बोलविलेल्या नालेसफाईच्या बैठकीस हजेरी लावली. मात्र, या बैठकीनंतर घाटे यांना नियुक्ती पत्र देण्याच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. त्यामुळे पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास केवळ घाटे यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती.पालिकेत १०० नगरसेवक असले तरी जेमतेम डझनभर नगरसेवक उपस्थित होते.