Pune : नगरसेवक गेले घरी, समस्या कोणाला सांगायच्या?

येरवडा –पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत संपल्याने पालिकेवर प्रशासक नेमल्यानंतर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी माननीय आयुक्तांनी सर्वसामान्यांच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख आणि त्या विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक प्रभागात फ्लेक्सवर लावावते, अशी मागणी जनस्वराज्य सेनेचे राहुल प्रताप यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.
नगरसेवकांचा कार्यकाल संपल्याने प्रशासक नेमण्यात आले आहे. प्रभागातील कचरा, ड्रेनेज, विद्युत, पाणीपुरवठा, डास निर्मूलन यासाठी नगरसेवकांच्या कार्यालयाशी संपर्क साधला जात होता. आता मात्र कोणाशी संपर्क साधायचा? असा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. प्रशासक हा पुणेकरांसाठी नवीन विषय असल्यामुळे सुयोग्य मार्गदर्शन अपेक्षित आहे. अनेक वेळा अधिकारी, कर्मचारी लोकप्रतिनिधी यांचे फोनही स्वीकारत नाहीत त्यामुळे सामान्य नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत. करोना आजाराच्या पार्श्वभुमीवर ज्या प्रमाणे 24 तास यंत्रणा उभारण्यात आली होती, तशी यंत्रणा आताही उभी करता येईल का, याच विचार करावा, अशी मागणी प्रताप यांनी निवेदनाद्वारे केली आहे.





