Pune News : जमिनीच्या वादातून खुनाची सुपारी! ५० हजारांत ठरवला जीव घेण्याचा सौदा; पुण्यातील हल्ल्याचा थरारक उलगडा
Pune News : एका ५५ वर्षीय व्यक्तीवर भरदिवसा धारदार कटरने चेहऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी धक्कादायक उलगडा केला आहे.

Pune News : जमिनीच्या वादातून एका व्यक्तीचा काटा काढण्यासाठी तब्बल ५० हजार रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सहकार आयुक्त कार्यालयातील सुनावणी संपवून बाहेर पडलेल्या व्यक्तीवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धारदार कटरने चेहऱ्यावर वार करून त गंभीर जखमी केले होते. (Pune News)
या हल्ल्यामागे जमिनीचा वाद असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणात एका १९ वर्षीय तरुणाला अटक केली असून, एका विधिसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यासाठी मुख्य आरोपीने ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (Pune News)
सुनावणी संपवून बाहेर पडताच हल्ला
जीवन रंगराव सूर्यवंशी ( ५५, रा. धाराशिव) हे २२ सप्टेंबरला दुपारी आपल्या वकिलांसोबत सहकार आयुक्त कार्यालय येथे सुनावणीसाठी आले होते. सुनावणी संपल्यानंतर ते ससून रुग्णालयाच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना गाठले. (Pune News)
काही कळण्याच्या आतच हल्लेखोरांनी धारदार कटरने त्यांच्या चेहऱ्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. हल्ला केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले. या प्रकरणी सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune News)
सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा माग
बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील प्रकाश आव्हाड आणि सारस साळवी यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढला. (Pune News)
हल्लेखोर एमएच १२ व्हीवाय ७६४३ क्रमांकाच्या दुचाकीवरून फिरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आनंद बाबा गव्हाणे ( १९, रा. गुलटेकडी, पुणे) आणि एका १५ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाला दांडेकर पुलाजवळ ताब्यात घेतले. (Pune News)
जमिनीचा वाद अन् ५० हजारांची सुपारी
ताब्यात घेतलेल्या दोघांकडे सखोल चौकशी केली असता, प्रविण बाळाजी सूर्यवंशी (रा. बाभूळगाव, ता. उमरगा) याचा फिर्यादी जीवन सूर्यवंशी यांच्याशी गेल्या काही दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता. (Pune News)
याच वादातून प्रविण याने दोघांना साधू वासवानी चौकातील निर्माण बार येथे भेटून फिर्यादीचा खून करण्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याचे उघड झाले. दोघेही प्रविणच्या गावाकडील असल्याने त्यांची ओळख आहे. यातील गव्हाणे हा फुड डिलिव्हरीचे काम करतो. तर मुख्य आरोपी प्रविण यानेच हल्ल्यासाठी कटर पुरवल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. (Pune News)
ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे आणि पोलिस निरीक्षक विनोद सलगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी राहुल पवार, सहाय्यक पोलिस फौजदार प्रदीप शितोळे, प्रकाश आव्हाड, सारस साळवी, निलेश पालवे, ज्ञानेश्वर गायकवाड, ज्ञानेश्वर बडे, महेश जाधव, मनोज भोकरे, शिवाजी सरक आणि अनिकेत माने यांनी केली. (Pune News)





